आळंदीतील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-महापूजा, अभिषेक, सामूहिक जप, चरित्र पारायण व महाप्रसादाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ

आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक बालविकास केंद्र, दिंडोरी प्रणित येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. धार्मिक परंपरांचे पालन करत विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आळंदी केंद्रात दिवसभर विविध आध्यात्मिक कार्यक्रमांची लगबग अनुभवायला मिळाली.

गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त षोडशोपचार पूजा, पवमान अभिषेक, भूपाळी, महानैवेद्य, आरती, सामूहिक जप, श्री स्वामी समर्थ चरित्र पारायण तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती व पादुकांवर मंगलमय वातावरणात अभिषेक करून आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली.

उत्सवानिमित्त संपूर्ण केंद्र आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली होती. केंद्राच्या प्रवेशद्वारावर रंगीबेरंगी रांगोळी, फुले, तोरणे आणि विद्युत रोषणाईने परिसर सजविण्यात आला होता. गुरुपौर्णिमा हा सद्गुरूंच्या चरणी कृतज्ञता, श्रद्धा, निष्ठा आणि भक्ती अर्पण करण्याचा पवित्र सोहळा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. महाआरतीनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आळंदीसह परिसरातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने भाविक या सोहळ्यास उपस्थित होते. दिवसभर सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेताना संपूर्ण परिसर “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” आणि “श्री स्वामी समर्थ” या जयघोषांनी दुमदुमून गेला.

दिंडोरी प्रणित सेवा मार्गानुसार शेकडो सेवेकऱ्यांनी सामूहिक जप, गुरुपीठ पूजन, हवन सेवा, श्री स्वामी समर्थ चरित्राचे सामूहिक पारायण तसेच विविध आरत्या आणि प्रार्थनांमध्ये सहभाग घेतला. सकाळच्या आरत्या, नारायण व गायत्री मातेची आरती, मंत्रपुष्पांजली, ऐक्य मंत्र, स्वामी माळ जप आणि विविध धार्मिक सेवा उत्साहात पार पडल्या. गुरुपौर्णिमेनिमित्त केंद्र रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले होते. हजारो सेवेकऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी आळंदी केंद्राचे प्रतिनिधी, विविध विभागांचे पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

Share This Article
Exit mobile version