कर्जमुक्तीचा लाभ हवा? पात्र शेतकऱ्यांनी तातडीने करा आधार प्रमाणीकरण : प्रा. संजय खडसे

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-सिंदखेडराजा उपविभागातील लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध; ई-केवायसी व अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला सिंदखेडराजा उपविभागात वेग आला असून, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) तसेच अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे.

प्रा. खडसे यांनी सांगितले की, शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) आणि अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक असणे अनिवार्य आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याने प्रथम पात्र लाभार्थी यादीत आपले नाव असल्याची खात्री करून जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र, सेतू केंद्र किंवा संबंधित कार्यालयात जाऊन आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, संबंधित सहकारी संस्था, तहसील कार्यालय, पंचायत समिती, सेतू केंद्र तसेच बँकांच्या शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी या याद्या तपासून आवश्यक कागदपत्रांसह आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. उपविभागातील एकही पात्र शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी ग्रामस्तरावरील अधिकारी, कर्मचारी, गटसचिव तसेच संबंधित बँकांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. पात्र शेतकऱ्यांकडून घरपोच जनजागृतीद्वारे आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घेण्यावर प्रशासनाचा भर असल्याचेही त्यांनी सांगितले.

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष तहसीलदार असून, सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. सहकार व महसूल विभागाच्या समन्वयातून कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी अधिक गतिमान करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता ई-केवायसी, आधार प्रमाणीकरण आणि अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करून शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले.

Share This Article
Exit mobile version