मेरा खुर्द येथे १ ऑगस्टला शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा व पुरस्कार वितरण सोहळा

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

स्व. अजितदादा पवार व स्व. भारतभाऊ बोंद्रे यांच्या स्मृतीनिमित्त आयोजन; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची राहणार उपस्थिती!

चिखली/देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : बुलढाणा जिल्ह्याच्या कृषी विकासाचे शिल्पकार व हरित क्रांतीचे जनक, माजी मंत्री स्व. भारतभाऊ बोंद्रे आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंती पंधरवडानिमित्ताने १ ऑगस्ट २०२६ (शनिवार) रोजी विशेष ‘शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा व पुरस्कार वितरण सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा चिखली तालुक्यातील मेरा चौक (मेरा खुर्द) येथील देशमुख फंक्शन लॉन येथे दुपारी १२:०० वाजता पार पडणार आहे.

बुलढाणा जिल्ह्याच्या सिंचन आणि कृषी समृद्धीत स्व. भारतभाऊ बोंद्रे आणि स्व. अजितदादा पवार यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार व भारतभाऊ यांच्या दूरदृष्टीतून आकारास आलेल्या खडकपूर्णा, जिगाव व पेनटाकळी यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या उभारणीसाठी व भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी स्व. अजितदादा पवार यांनी मोलाचा वाटा उचलला होता. या नेत्यांच्या शेतकरीहिताच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या मार्गदर्शन कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय आयुषमंत्री तथा आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव राहणार आहेत. तर महाबीज अकोलाचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी (IAS) यांच्याहस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. तसेच या कार्यक्रमाला माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार मनोज कायंदे, चिखली तालुक्याच्या विकासकन्या आमदार श्वेताताई महाले पाटील, माजी आमदार तोताराम कायंदे, रेखाताई खेडेकर, शंतनुभाऊ बोंद्रे, शशिकांत खेडेकर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष नाझेर काझी व जिल्हाध्यक्ष देवेंद्रदादा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.


तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्रे

शेतकरी बांधवांना प्रगतशील व तंत्रज्ञानस्नेही बनवण्यासाठी विविध तज्ज्ञ खालील विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत:

  • शेतीमध्ये सूक्ष्म जीवाणू वापर व खरीप नियोजन: डॉ. अमोल झापे (वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा)
  • कापूस व्यवस्थापन: डॉ. बी. आर. पाटील (वरिष्ठ शास्त्रज्ञ, पी.डी.के.व्ही., अकोला)
  • सिंचन कायदा २००५ व पाणी वापर संस्था: डॉ. रेणुकादास भरसवाडकर (माजी प्राध्यापक वाल्मी, छत्रपती संभाजीनगर)
  • बीज उत्पादन: वल्लभराव देशमुख (संचालक, महाबीज)
  • पाणी व्यवस्थापन: भागवत भराड (माजी उपविभागीय अभियंता, खडकपूर्णा)
  • हळद व आल (आद्रक) व्यवस्थापन: विठ्ठल धांडे (उपकृषी अधिकारी, मेहकर)
  • फळ पिके व्यवस्थापन: डॉ. अनिल तारू (विशेष तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा)
  • कृषी क्षेत्रात महिलांचे योगदान: संतोष परिहार
  • कृषी विभागातील विविध योजना: अशोक सुरडकर (तालुका कृषी अधिकारी, चिखली)

या सोहळ्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष, जयभारत अर्बन व रेणुकादेवी बीज प्रक्रिया केंद्राचे अध्यक्ष शंतनु भारतभाऊ बोंद्रे आणि शेतकरी नेते शेनफडराव घुबे यांच्यावतीने करण्यात आले आहे. परिसरातील जास्तीतोटी शेतकऱ्यांनी व नागरिकांनी या शेतकरी हितोपयोगी कार्यशाळेस आणि अभिवादन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share This Article
Exit mobile version