‘अँग्रीस्टॅक एरर’मुळे कर्जमुक्तीच्या केवायसीला ब्रेक; शेतकऱ्यांनी घाबरू नये!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

तलाठी कार्यालयात ७/१२ अन् आरओआर नोंदी तपासून अद्ययावत करण्याचे तहसीलदारांचे आवाहन

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत ई-केवायसी (e-KYC) करताना काही शेतकऱ्यांना ‘अँग्रीस्टॅक आयडी एरर’ या तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रणालीमध्ये केवायसी प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, या अडचणीमुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता तातडीने संबंधित तलाठी कार्यालयाशी संपर्क साधून जमीन नोंदींची पडताळणी व दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन सिंदखेडराजाचे तहसीलदार अजित दिवटे यांनी केले आहे.

कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी पूर्ण होणे अनिवार्य आहे. केवायसी दरम्यान ‘अँग्रीस्टॅक आयडी एरर’ दर्शवला जात असल्यास, शेतकऱ्याच्या मूळ जमीन नोंदीतील (७/१२) माहिती आणि अँग्रीस्टॅक प्रणालीतील उपलब्ध विवरणात तफावत असण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे या तांत्रिक त्रुटीकडे दुर्लक्ष न करता वेळेत नोंदी अद्ययावत करणे गरजेचे आहे.

अडचण येणाऱ्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम गावातील तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. तलाठ्यांच्या अधिकृत लॉगिनमधून लाभार्थ्याच्या ‘आरओआर’ (ROR) अर्थात ७/१२ जमीन नोंदींची सखोल तपासणी केली जाईल. जमिनीच्या नोंदीमध्ये नाव, क्षेत्रफळ, गट क्रमांक किंवा इतर माहितीत तफावत किंवा अपूर्णता आढळल्यास, विहीत प्रक्रियेनुसार ‘ROR Update’ करून नोंद तत्काळ अद्ययावत करून घेणे शक्य होणार आहे.

‘Yes-Yes’ पर्याय निवडणे बंधनकारक

आरओआर पडताळणीची प्रक्रिया करताना प्रणालीतील उपलब्ध पर्यायांपैकी Option 1 – Yes आणि Option 2 – Yes अशी निवड करणे आवश्यक आहे. त्यानंतर अद्ययावत केलेली माहिती Save करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माहिती सेव्ह न केल्यास केलेले बदल प्रणालीत लागू होणार नाहीत, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. ७/१२ व आरओआर नोंदीची पडताळणी व दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांनी पुन्हा एकदा ई-केवायसी करून पाहावी. जमीन नोंदीतील माहिती आणि अँग्रीस्टॅक प्रणालीतील माहितीत ताळमेळ बसल्यानंतर ‘अँग्रीस्टॅक आयडी एरर’ची अडचण दूर होऊन केवायसी यशस्वीरीत्या पूर्ण होईल.

केवायसी प्रलंबित ठेवू नका! “कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अँग्रीस्टॅक एरर येत असल्यास वारंवार प्रयत्न करण्याऐवजी प्रथम तलाठी कार्यालयातून जमीन नोंदी अचूक व अद्ययावत करून घ्याव्यात.” — अजित दिवटे, तहसीलदार, सिंदखेडराजा

Share This Article
Exit mobile version