शाळेच्या आवारातच गाठून मोबाईल नंबरची मागणी; अर्बन विद्यानिकेतन परिसरातील प्रकाराने खळबळ!
चिखली (अंकुश पाटील) : शाळेत जाणाऱ्या ३८ वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग करून छेडछाड केल्याप्रकरणी चिखली शहर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. “तुम्ही मला खूप आवडता, मला तुमचा मोबाईल नंबर हवा आहे,” असे म्हणत त्याने शिक्षिकेशी बोलण्याचा आग्रह धरला होता. ही घटना बुधवारी (२९ जुलै) सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास चिखली येथील अर्बन विद्यानिकेतन शाळा परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी अकील अहमद अब्दुल अहमद (रा. चिखली) याच्याविरुद्ध ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) कलम ७८ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित शिक्षिका बुधवारी सकाळी ८.४५ ते ८.५० वाजेच्या सुमारास अर्बन विद्यानिकेतन शाळेत जात होत्या. यावेळी आरोपी अकील अहमद याने त्यांचा पाठलाग केला. शिक्षिकेला गाठून “तुम्ही मला खूप आवडल्या असून मला तुमच्याशी बोलायचे आहे,” असे सांगत त्याने त्यांच्याकडे मोबाईल क्रमांकाची मागणी केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या शिक्षिकेने तात्काळ चिखली शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ६४३/२०२६ नोंदवला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक भूषण गावंडे आणि पोलीस उपनिरीक्षक सुधन सुसर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास चतरकर करत आहेत.

