विशेष बातमी / मुंबई : अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘MHT-CET’ परीक्षा आता वादाच्या भोवऱ्यात सापडली असून लाखो गुणवंत विद्यार्थ्यांच्या भविष्यावर दलालांनी दरोडा टाकल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. बारावीच्या परीक्षेत अवघे ४० ते ४५ टक्के मिळवून जेमतेम पास झालेल्या विद्यार्थ्यांना CET मध्ये थेट १०० पर्सेंटाईलचे ‘दान’ मिळाल्याने राज्यभरातून संतापाचा उद्रेक होत आहे. १३ लाखांची लाच द्या अन् COEP, VJTI सारख्या नामांकित संस्थांमध्ये हवा तो प्रवेश मिळवा, असा उघड-उघड ‘मॅनेजिंग’चा बाजार मांडला गेल्याचे पुरावे समोर आल्याने पालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
दलालीचा ‘ऑडिओ’ व्हायरल; परीक्षा केंद्रेच ‘मॅनेज’?
MHT-CET च्या निकालात पारदर्शकतेचा बुरखा पार फाटला आहे. ज्या विद्यार्थ्यांना Physics मध्ये ३६ ते ३८ गुण आहेत, ते सीईटीच्या मेरिट लिस्टमध्ये ‘टॉपर’ कसे बनू शकतात? यामागचे गौडबंगाल आता उघडे पडू लागले आहे. परीक्षा केंद्रे ‘मॅनेज’ करून १३ लाखांच्या बोलीवर मनसोक्त गुण वाटल्याच्या दोन व्यक्तींमधील संभाषणाच्या कथित ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या आहेत. परभणीसह राज्यभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांनी आता या महाघोटाळ्याच्या निष्पक्ष चौकशीची मागणी करत सरकारला धारेवर धरले आहे.
आकडेवारी बोलतात… गैरप्रकारांची मालिका उघडी!
२२ जुलैला सीईटी सेलने जाहीर केलेल्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीनेच या घोटाळ्याची लक्तरे वेशीवर टांगली आहेत:
- १०० पर्सेंटाईलचे गूढ: १०० पर्सेंटाईल गुण मिळालेल्या तब्बल ७ विद्यार्थ्यांना बारावीत पीसीएम (PCM) गटात ६० टक्क्यांपेक्षाही कमी गुण आहेत!
- अवघ्या ३५-३८ गुणांची ‘कमाल’: ९९.४१ पर्सेंटाईल मिळालेल्या एका विद्यार्थिनीला बारावीत अवघे ४३.६७ टक्के गुण आहेत, तर फिजिक्समध्ये फक्त ३६ गुण!
- ६० टक्क्यांखालील ‘गुणवंत’: बारावीच्या पीसीएम गटात ६० टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेल्या ५७२ विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये ९७ पर्सेंटाईलपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना बारावीची साधी परीक्षा पेलवली नाही, त्यांना सीईटीत अचानक साक्षात्कार झाला की दलालांच्या पैशांच्या थैलीचा हा ‘चमत्कार’ आहे? असा सवाल आता विचारला जात आहे.
ठराविक ‘केंद्रां’वरच गुणांचा पाऊस का?
निकालाचे विश्लेषण केले असता ठराविक महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रांवरूनच ९९ टक्के आणि त्याहून अधिक पर्सेंटाईल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुकाळ झाल्याचे दिसते.
| कॉलेजचे नाव | ९९% पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळालेले विद्यार्थी |
| रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेज, पुणे | २२२ |
| ठाकूर कॉलेज, कांदिवली | १३३ |
| जी. एच. रायसोनी टेक्निकल इन्स्टिट्यूट | १२२ |
| गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, पुणे | १०८ |
| शहा अँड अँकर कॉलेज, मुंबई | ९९ |
एकाच केंद्रावरून शेकडो विद्यार्थ्यांना ९९ पर्सेंटाईल मिळणे हा केवळ योगायोग असू शकत नाही, हा सरळ-सरळ सेटलमेंटचा खेळ असल्याचा संशय शिक्षणतज्ज्ञ महेश पाटील आणि कोचिंग क्लासचे शिक्षक संभाजी सवडकर यांनी व्यक्त केला आहे.
CET सेलचा ‘केविलवाणा’ बचाव!
लाखो विद्यार्थ्यांच्या पाठीत खंजीर उपसल्याचा आरोप होत असताना ‘सीईटी सेल’ने मात्र नेहमीप्रमाणे कानावर हात ठेवले आहेत. सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असले तरी “आम्ही अंतर्गत विश्लेषण करणार आहोत,” अशी गुळगुळीत प्रतिक्रिया देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे. कष्टकरी आणि गुणवंत विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीस मिळवणाऱ्या या पर्सेंटाईल घोटाळ्याची उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी करून यामागील सूत्रधार आणि भ्रष्ट दलालांना बेड्या ठोकल्याच पाहिजेत, अशी तीव्र मागणी आता जोर धरत आहे!

