‘लेक माझी लाडकी’ अभियानांतर्गत लोणार येथे ‘LIC विमा सखी’ स्वयंरोजगार मेळावा उत्साहात

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विमा सखी योजनेची माहिती; सुमारे ३०० विद्यार्थिनी, अंगणवाडी सेविका व बचतगट महिलांचा सहभाग

लोणार (वाजिद खान) : स्थानिक कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय तसेच कै. कमलाबाई बनमेरू कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय, लोणार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लेक माझी लाडकी’ अभियानांतर्गत ‘LIC विमा सखी’ स्वयंरोजगार मेळाव्याचे भव्य आयोजन २७ जुलै रोजी करण्यात आले. कै. कमलाबाई बनमेरू व कै. कु. दुर्गाताई बनमेरू यांच्या पुण्यस्मरणार्थ हा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जात असून, यावर्षीही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू होते. उद्घाटक म्हणून लोकजागर परिवाराचे मुख्य विश्वस्त प्रवीण गीते उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून लोणार नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. मीराताई भूषण मापारी, महिला व बालकल्याण सभापती सौ. वर्षाताई मापारी, समाजसेविका सौ. वैशाली तोडकर, स्वयंरोजगार मेळावा समन्वयक व मुख्य जीवन विमा सल्लागार (LIC) डी. एस. काळे तसेच दुसरबीडचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष याकुब शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात प्रा. डॉ. कमलाकर वाव्हळ यांनी ‘लेक माझी लाडकी’ अभियानाची भूमिका आणि स्वयंरोजगार मेळाव्याचे महत्त्व स्पष्ट केले. प्रमुख अतिथी सौ. मीराताई मापारी यांनी अंगणवाडी सेविका, बचतगटातील महिला आणि विद्यार्थिनींनी या उपक्रमाचा लाभ घेऊन स्वावलंबी बनावे, असे आवाहन केले.

लोकजागर परिवाराचे मुख्य विश्वस्त प्रवीण गीते यांनी आपल्या ग्रामीण शैलीतील मार्गदर्शनातून महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर भाष्य केले. जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून महिलांनी स्वतःच्या प्रगतीसाठीही प्रयत्नशील राहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मुख्य जीवन विमा सल्लागार डी. एस. काळे यांनी ‘LIC विमा सखी’ योजनेची सविस्तर माहिती देत महिलांनी स्वतःच्या व्यवसायासोबत किंवा नोकरीसोबत विमा प्रतिनिधी म्हणून कार्य करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन केले. त्यांनी जीवन विम्याचे महत्त्व, आर्थिक सुरक्षितता तसेच स्वयंरोजगाराच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांनी महाविद्यालय ग्रामीण भागातील विद्यार्थिनी व महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. भविष्यातही महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशाच योजना व उपक्रम राबविण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शारीक शेख यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. शिवशंकर मोरे यांनी केले. या स्वयंरोजगार मेळाव्यास अंगणवाडी सेविका, बचतगटातील महिला तसेच महाविद्यालयातील सुमारे ३०० विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Share This Article
Exit mobile version