व्हर्च्युअल टाउन हॉल ‘ड्रग फ्री पिंपरी-चिंचवड’ उपक्रमाचे धानोरे येथे ऑनलाइन आयोजन उत्साहात

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-अमली पदार्थमुक्त समाजासाठी जनजागृती; विद्यार्थी, पोलीस, सामाजिक संस्था आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

आळंदी (अर्जुन मेदनकर) : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘व्हर्च्युअल टाउन हॉल – ड्रग फ्री पिंपरी-चिंचवड’ या जनजागृती उपक्रमाचे ऑनलाइन आयोजन पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धानोरे येथील राठी सभागृहात उत्साहात पार पडले.

अमली पदार्थांच्या व्यसनापासून युवकांना दूर ठेवणे, समाजात जनजागृती निर्माण करणे आणि ड्रग्जविरोधी वातावरण तयार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पुढाकारातून शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि जागरूक नागरिकांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. इंद्रायणी असोसिएशन आणि आळंदी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमाजी नरके, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, इंद्रायणी असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र फणसे, माजी अध्यक्ष राजेंद्र कांबळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे, शिक्षकवृंद, आळंदी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच शाळेतील विद्यार्थी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

युवकांनी व्यसनापासून दूर राहून शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. उपस्थितांनी ‘ड्रग फ्री पिंपरी-चिंचवड’ या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अमली पदार्थमुक्त समाज घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.

Share This Article
Exit mobile version