-योजनेची अंमलबजावणी गतीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; ई-केवायसीसाठी कोणतेही शुल्क न देण्याचे आवाहन
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ चा लाभ जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना जलदगतीने मिळावा, यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाहीला वेग दिला आहे. योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी आपला ॲग्रीस्टॅक (AgriStack) क्रमांक सोबत घेऊन जवळच्या महा-ई-सेवा किंवा सीएससी केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) तातडीने पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी १०० टक्के मोफत असून, योजनेचे काम विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांनी दिले आहेत.
योजनेची पहिली यादी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, तलाठी कार्यालये, विकास सोसायट्या तसेच बँकांच्या शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे या यादीत नाहीत, त्यांनी चिंता करू नये. त्यांची नावे पुढील यादीत समाविष्ट करण्यात येतील, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी दिली. यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याची तसेच कर्जमाफीच्या रकमेची माहिती तपासून तातडीने मोफत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. ई-सेवा केंद्र चालकांना शासनाकडून मोबदला मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी कोणतेही शुल्क देऊ नये, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत. तसेच, माहितीमध्ये काही त्रुटी आढळल्यास संबंधित शेतकऱ्यांनी थेट पोर्टलवर तक्रार नोंदवावी. प्रशासकीय समितीमार्फत अशा तक्रारींचे तत्परतेने निराकरण करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या गावांमध्ये आधार प्रमाणीकरण केंद्र उपलब्ध नाही, तेथे तातडीने नवीन केंद्रे सुरू करण्यात येणार असून, ग्रामपंचायतींमधील बंद असलेली केंद्रेही तत्काळ कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी या मोफत सुविधेचा लाभ घेऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, जेणेकरून कर्जमाफीचा लाभ लवकर मिळू शकेल, असे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कवळे, जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, संजय खडसे (सिंदखेडराजा), रवींद्र जोगी (मेहकर), अग्रणी बँक व्यवस्थापक शैलेंद्र सिंह, महा आयटीचे प्रसन्न बोरकर तसेच बीडीसीसीचे आर. टी. मस्के उपस्थित होते. याशिवाय, दृक्श्राव्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सहायक निबंधक आणि तालुका कृषी अधिकारी सहभागी झाले होते. प्रशासनातील सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून योजना यशस्वी करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले.