-काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अनंत मोहोड यांच्याकडून गौरव
वर्धा (प्रकाश कथले) : ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अरुण पावडे यांचे आरोग्यसेवेतील कार्य हे समाजासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ असून, त्यांच्या नेतृत्वाखाली इंडियन रेडक्रॉस सोसायटीने जिल्ह्यातील विविध भागांतील रुग्ण तसेच आपत्तीग्रस्त नागरिकांना सातत्याने आधार दिला आहे, असे गौरवोद्गार काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अनंत बाबूजीदादा मोहोड यांनी काढले.
तळेगाव येथे सीडेट एक्स्प्लो आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या अनंत मोहोड यांनी ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अरुण पावडे तसेच डॉ. प्रतिभा पावडे यांच्या आरोग्यसेवा आणि समाजहिताच्या कार्याचा गौरव केला. यावेळी बोलताना त्यांनी, “निरोगी महिला, सशक्त समाज” ही संकल्पना जनहिताची असून अशा उपक्रमांमुळे समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होत असल्याचे सांगितले. राज्यावर ओढवलेल्या विविध नैसर्गिक आपत्तींच्या काळात डॉ. अरुण पावडे यांच्या नेतृत्वाखाली इंडियन रेडक्रॉस सोसायटीने संकटग्रस्त नागरिकांसाठी औषधे, कपडे, ब्लँकेट आणि इतर अत्यावश्यक साहित्य पाठवून मोलाची मदत केली. तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन करून गरजू रुग्णांसाठी रक्तपुरवठाही उपलब्ध करून दिल्याची आठवण त्यांनी करून दिली. नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करणे, आजारांचे प्रतिबंध आणि गरजू रुग्णांना दिलासा देण्यासाठी डॉ. अरुण पावडे यांनी केलेले कार्य राज्यभरात नावलौकिकास पात्र ठरले असल्याचेही अनंत मोहोड यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला काँग्रेसचे विविध पदाधिकारी, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रशेखर जोरे तसेच अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

