-रुग्णहिताच्या उपक्रमांना महापालिकेचा हातभार; दररोज घंटागाडी, घनकचरा प्रकल्पासाठी CSRमधून मदतीचे आश्वासन
जालना (सुरेश हुसे) : जिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवा, स्वच्छता व्यवस्था आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उपलब्ध सुविधांचा आढावा घेण्यासाठी जालना महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश राऊत यांनी मंगळवारी (दि. २८ जुलै) जिल्हा रुग्णालयाला सदिच्छा भेट दिली. रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करून त्यांनी कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासह रुग्णहिताच्या विविध उपक्रमांसाठी महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांसाठी उपलब्ध धर्मशाळेची सुरक्षा, स्वच्छता तसेच स्वच्छतागृहांच्या सुविधांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. उपचारासाठी दूरवरून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. महानगरपालिकेकडून स्वच्छता व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठीच्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी मिळणाऱ्या सहकार्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. रुग्णहिताला केंद्रस्थानी ठेवून महानगरपालिका आणि जिल्हा रुग्णालय प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने उपमहापौर राजेश राऊत यांची ही सदिच्छा भेट महत्त्वपूर्ण ठरली.

