-‘जय भीम’, ‘जय संविधान’च्या घोषणांनी दुमदुमले शहर; उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्याची मागणी, २९ जुलैच्या बुलढाणा मोर्चाची घोषणा
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : अनुसूचित जाती (एससी) उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवून घटनात्मक हक्कांचे संरक्षण करावे, या प्रमुख मागणीसाठी अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी (दि. २७) सिंदखेडराजा येथे विराट जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शासकीय विश्रामगृहापासून निघालेला हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेनंतर उपविभागीय अधिकारी संजय खडसे आणि तहसीलदार अजित दिवटे यांना मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन देण्यात आले.
मोर्चात हजारो समाजबांधव, समता सैनिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात निळे झेंडे, फलक आणि बॅनर घेऊन सहभागी झालेल्या आंदोलकांनी “जय भीम”, “जय संविधान”, “आरक्षण बचाव, समाज वाचवा”, “आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं”, “संविधानविरोधी उपवर्गीकरण बंद करा” अशा घोषणांनी संपूर्ण सिंदखेडराजा शहर दणाणून सोडले. मोर्चामध्ये महिलांचा आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. मोर्चाचा समारोप उपविभागीय कार्यालयासमोरील संत सावता महाराज मैदानात जाहीर सभेने झाला. सभेत विविध वक्त्यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणामुळे समाजात निर्माण होणारा असंतोष, सामाजिक न्यायाच्या तत्त्वांवर होणारा परिणाम आणि संविधानाच्या भावनेवर होणाऱ्या आघाताबाबत परखड मते व्यक्त केली. यानंतर संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन सादर केले. निवेदनात अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, माजी न्यायमूर्ती अनंत बदर आयोगाचा अहवाल सार्वजनिक करून एकसदस्यीय समिती रद्द करावी, अनुसूचित जाती समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सर्वेक्षण करून अहवाल जाहीर करावा, शासकीय व निमशासकीय सेवांतील अनुशेष पदे तातडीने भरावीत तसेच विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, वसतिगृहे, कौशल्य विकास आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाच्या सुविधा वाढवाव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. तसेच संविधानाच्या कलम १४, १५(१), १६(१) आणि ३४१ मधील समानता व सामाजिक न्यायाच्या तत्त्वांना बाधा पोहोचविणारा कोणताही निर्णय घेऊ नये, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या मोर्चाचे आयोजन अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती, सिंदखेडराजा यांच्या वतीने करण्यात आले होते. जि.प. सदस्य पंडितराव खंदारे, भाई बबन म्हस्के, मधुकर साळवे, कैलास झिने, योगेश म्हस्के, हिम्मतराव काळे, सुमेध गवई, पत्रकार भगवान साळवे, राहुल झोटे, रामदास कहाळे आणि मधुकर शिंदे यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी, महिला प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि हजारो नागरिक उपस्थित होते. शासनाने मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच २९ जुलै रोजी बुलढाणा येथे उपवर्गीकरणविरोधी भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चाचे नेतृत्व आंबेडकरी नेते आनंदराज आंबेडकर करणार असल्याची माहितीही आयोजकांनी दिली. मोर्चादरम्यान समता सैनिकांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण व्यवस्था सांभाळली. त्यामुळे मोर्चा शांततेत व शिस्तीत पार पडल्याचे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.


