-श्रीक्षेत्र साखरखेर्डा येथील पलसिद्ध महास्वामी धर्मपीठात गुरुपौर्णिमा महोत्सव; हजार वर्षांची गुरु-शिष्य परंपरा आजही अखंड
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : भारतीय संस्कृती ही गुरुतत्त्वाला सर्वोच्च स्थान देणारी आणि गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करणारी संस्कृती आहे. मानवी जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारे गुरु हेच जीवनाला योग्य दिशा देतात. त्यामुळे गुरुशिवाय मानवी जीवनाला पूर्णत्व प्राप्त होत नाही, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र साखरखेर्डा येथील श्रीमद् जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी धर्मपीठाचे मठाधिपती ष.ब्र.१०८ वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त केले.
याच गुरु-शिष्य परंपरेचे जतन करणारे श्रीक्षेत्र साखरखेर्डा येथील श्रीमद् जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी धर्मपीठ हे सुमारे एक हजार वर्षांपासून अखंडपणे कार्यरत असून, धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. गुरुकुल परंपरेचा वारसा जपत अनाथ मुलांचे संगोपन, शिक्षण, धर्मप्रबोधन तसेच समाजोपयोगी विविध उपक्रम या धर्मपीठामार्फत आजही राबविले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. गुरुपौर्णिमा हा आपल्या गुरुंचा गौरव करण्याचा, त्यांच्या ऋणाची जाणीव ठेवण्याचा आणि गुरु-शिष्य परंपरेप्रती श्रद्धा, निष्ठा व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. ज्यांनी जीवनाला योग्य दिशा दिली, माणूस म्हणून घडविले आणि संस्कारांची शिकवण दिली, त्या सर्व गुरुजनांना साष्टांग प्रणाम करण्याचे आवाहनही सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांनी यावेळी केले.

