-शेतकरी कुटुंबातील युवकाची एमपीएससीतून घवघवीत भरारी; संघर्षातून घडले प्रेरणादायी यश
दुसरबीड (भगवान नागरे) : काही स्वप्ने अपूर्ण राहतात; मात्र त्याच अपूर्ण स्वप्नांतून नव्या ध्येयाची प्रेरणा मिळते. याच प्रेरणेचे जिवंत उदाहरण म्हणजे तालुक्यातील हनवतखेड येथील शेतकरी कुटुंबातील अनिल कारभारी जायभाये. शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून शिक्षण पूर्ण केलेल्या अनिल यांचे ते स्वप्न आर्थिक व कौटुंबिक परिस्थितीमुळे पूर्ण होऊ शकले नाही. मात्र त्यांनी हार न मानता जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश मिळवत राज्य उत्पादन शुल्क विभागात एक्साईज पोलीस उपनिरीक्षक (Excise PSI) पदावर नियुक्ती मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
हनवतखेड येथील शेतकरी कुटुंबात वाढलेल्या अनिल जायभाये यांना लहानपणापासून शिक्षक बनून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याची इच्छा होती. मात्र परिस्थितीने त्यांना वेगळा मार्ग निवडण्यास भाग पाडले. अनेकजण अशा प्रसंगी निराश होतात; परंतु अनिल यांनी अपयशाला कधीही अंतिम सत्य मानले नाही. अपूर्ण राहिलेल्या स्वप्नालाच त्यांनी नव्या यशाची प्रेरणा बनवत स्पर्धा परीक्षांचा मार्ग स्वीकारला. सातत्यपूर्ण अभ्यास, प्रामाणिक मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी प्रथम मुंबई पोलीस दलात स्थान मिळवले. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागात सेवा करण्याची संधी मिळाली. मात्र एवढ्यावर समाधान न मानता त्यांनी अधिक मोठे ध्येय निश्चित करून एमपीएससीची तयारी अविरत सुरू ठेवली. कठोर परिश्रम, संयम आणि दृढ इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी अखेर एमपीएससी परीक्षेत यश मिळवत राज्य उत्पादन शुल्क विभागात एक्साईज पोलीस उपनिरीक्षक (Excise PSI) पदावर नियुक्ती मिळवली. त्यांचे हे यश केवळ वैयक्तिक यश नसून संघर्ष करणाऱ्या आणि मोठी स्वप्ने पाहणाऱ्या प्रत्येक युवकासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
अनिल कारभारी जायभाये यांच्या यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये, मित्रपरिवारात तसेच हनवतखेड आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे. शेतकरी कुटुंबातून कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, परिस्थितीपेक्षा ध्येय मोठे असते, हे अनिल जायभाये यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखविले आहे.

