चिखलीत थरार: बँकेच्या सहायक व्यवस्थापकावर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला; दोन्ही हात-पाय फ्रॅक्चर!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

चिखलीतील जालना रोडवरील घटना; तीन अनोळखी हल्लेखोर फरार, पोलिसांकडून कसून शोध सुरू!

चिखली (अंकुश पाटील) : शहरातील जालना रोडवर बुलढाणा अर्बन बँकेच्या सहायक व्यवस्थापकावर तीन अनोळखी इसमांनी लोखंडी गजाने अत्यंत क्रूरपणे हल्ला केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या भीषण हल्ल्यात बँकेचे सहायक व्यवस्थापक गंभीर जखमी झाले असून त्यांच्या दोन्ही हातांना व पायांना गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले आहे. महेश लहु जगदाळे (३१, रा. पुंडलिक नगर, चिखली) असे गंभीर जखमी झालेल्या बँक अधिकाऱ्याचे नाव आहे. ते मागील एक वर्षापासून बुलढाणा अर्बन बँकेच्या चिखली शाखेत सहायक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास महेश जगदाळे हे आपल्या मोटारसायकलने जिमकडे जात होते. पुंडलिक नगरच्या कमानीजवळील उतारावर त्यांनी आपल्या वाहनाचा वेग कमी केला. याच दरम्यान, रस्त्यावर नंबर प्लेट नसलेली एक राखाडी (ग्रे) रंगाची स्विफ्ट डिझायर कार उभी होती. कारमधून लोखंडी गज हातात घेऊन उतरलेल्या एका व्यक्तीने अचानक त्यांच्या डाव्या हातावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात महेश रस्त्यावर कोसळले, त्यानंतर कारमधील दुसरा व्यक्तीही खाली उतरला. दोघांनी मिळून त्यांच्या दोन्ही हातांवर आणि पायांवर लोखंडी गजाने बेदम वार केले. यादरम्यान, तिसरा व्यक्ती चालकाच्या जागेवरच बसून होता. हल्ला केल्यानंतर तिघेही हल्लेखोर आपली कार घेऊन मेहकर फाट्याच्या दिशेने पसार झाले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महेश यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने चिखलीतील एका रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना तात्काळ जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारामुळे पोलिसांत तक्रार देण्यास काहीसा विलंब झाल्याची माहिती जखमीची आई सुनिता जगदाळे यांनी दिली आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या खुनी हल्ल्यामागचे नेमके कारण काय आणि यामागील मुख्य सूत्रधार कोण, याचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध बाजूंनी तपास करत असून या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Share This Article
Exit mobile version