मेहकर युवासेना विधानसभा अध्यक्षपदी अमोल म्हस्के यांची नियुक्ती; शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

चिखली-मेहकर महामार्ग आंदोलनासह विविध सामाजिक संघर्षांमुळे राहिलेत चर्चेत; युवा नेटवर्क उभारण्यात मिळवलेय यश!

हिवरा आश्रम (अरूणा म्हस्के पाटील) — हिंदुहृदयसम्राट स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि बुलढाणा जिल्ह्याचे युवासेना जिल्हाध्यक्ष ऋषी प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा सेनेच्या संघटन बांधणीत एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. मेहकर-लोणार विधानसभा क्षेत्राच्या युवा सेना (शिंदे गट) अध्यक्षपदी युवा तडफदार नेतृत्व अमोल सीताराम म्हस्के (रा. ब्रह्मपुरी, ता. मेहकर) यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे संपूर्ण मेहकर व लोणार तालुक्यांतील युवा शिवसैनिकांमध्ये आनंदाची आणि उत्साहाची लाट पसरली आहे.

कष्टाळू, आक्रमक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी असणारे शिवसैनिक म्हणून अमोल म्हस्के यांची पंचक्रोशीत ओळख आहे. पक्षाप्रती निष्ठा आणि तळागाळातील युवकांना एकत्र करून पक्षाचे जाळे मजबूत करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत लक्षात घेऊन युवा सेना नेतृत्वाने त्यांच्यावर या जबाबदारीची धुरा सोपवली आहे. म्हस्के यांनी मेहकर-चिखली महामार्गावरील धोकादायक भेगा आणि खड्ड्यांमुळे प्रवाशांचे व वाहनचालकांचे हाल होत असताना, त्याविरोधात प्रशासनाला धारेवर धरत केलेले जोरदार आक्रमक आंदोलन राज्यभर चर्चेत आले होते. शेतकरी आणि शेतमजुरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर त्यांनी वारंवार आक्रमक भूमिका घेत प्रशासनाशी लढा दिला आहे. तसेच, खेड्यापाड्यांपर्यंत युवा सेना पोहोचवून तळागाळातील युवकांचे भक्कम जाळे उभारण्यात त्यांना उल्लेखनीय यश मिळाले आहे. केवळ राजकीय संघर्षच नव्हे, तर परिसरातील विविध अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सदैव धावून जात अनेकांना जीवनदान मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी भक्कम ताकद उभी करण्यासाठी आपण आपले पक्ष-संघटनेतील कार्य अधिक जोमाने व निष्ठेने करावे, असे आवाहन युवा सेना सहसचिव (महाराष्ट्र राज्य) तथा बुलढाणा जिल्हा युवासेना जिल्हाध्यक्ष ऋषी प्रतापराव जाधव यांनी नियुक्तीपत्र प्रदान करताना केले आहे.

“युवासेनेच्या माध्यमातून तळागाळातील प्रत्येक युवकाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि पक्षाची ताकद अधिक वाढवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.”

— अमोल म्हस्के, नवनियुक्त विधानसभा अध्यक्ष, युवासेना (मेहकर-लोणार)

Share This Article
Exit mobile version