– कर्ज २ लाखांच्या आत तरीही व्याजाची वसुली; विनायक सरनाईक यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासकीय यंत्रणेत खळबळ!
– केवायसी आणि बँकेच्या आकडेवारीत मोठी तफावत; ‘सरसकट कर्जमाफी’साठी क्रांतीकारी शेतकरी संघटना आक्रमक
– अपुऱ्या लाभाच्या नावाखाली बळीराजाची फसवणूक; न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा सरनाईक यांनी भरला दम!
चिखली (अंकुश पाटील): राज्य सरकारने तब्बल दोन वर्षे अभ्यास करून जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या पहिल्याच यादीत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक तफावत आणि त्रुटी समोर आल्या आहेत. प्रशासनाने जाहीर केलेली यादी, केवायसी (KYC) पावती आणि बँकेकडून प्रत्यक्षात लिहून दिलेली रक्कम यामध्ये कोणतीही सुसंगती नसल्याने सर्वकाही विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाखांच्या आत असतानाही बँका त्यावरील वरचे व्याज भरण्याचा सल्ला देत असल्याने बळीराज्यात संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर प्रकारावर तातडीने तोडगा काढून शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे सरसकट आणि विनाअट कर्ज माफ करावे, या मागणीसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कार्यकारी परिषद सदस्य विनायक रामभाऊ सरनाईक यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलढाणा यांच्याकडे अधिकृत निवेदन सादर केले असून, न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
एकीकडे निसर्गाचा लहरीपणा, वाढता उत्पादन खर्च आणि दुसरीकडे कर्जाचा डोंगर अशा दुहेरी फेऱ्यात अडकलेल्या बळीराजाला या अपुऱ्या लाभामुळे मोठा मानसिक धक्का बसला आहे. “कर्जमाफी हा शेतकऱ्याचा हक्क आहे, उपकार नाही,” असे स्पष्ट करत विनायक सरनाईक यांनी शासनाच्या सदोष अंमलबजावणीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
या गोंधळामुळे शासनाची प्रतिमा मलीन होत असून, तिढा न सुटल्यास आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात येणार आहे. निवेदनाद्वारे खालील मागण्या करण्यात आल्या आहेत: १. कर्जमाफीच्या याद्या, केवायसी पावती आणि बँकेची माहिती यामधील तफावत तातडीने तपासून दुरुस्त करण्यात यावी. २. यादीत नाव असलेल्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याचे २ लाख रुपयांपर्यंतचे संपूर्ण कर्ज (मुद्दल + व्याज) विनाअट माफ करण्याचे आदेश संबंधित बँकांना द्यावेत. ३. कमी रक्कम दिसण्याचे कारण, उर्वरित रकमेबाबत लेखी खुलासा देणे आणि कर्ज दोन लाखांच्या आत असताना व्याज भरण्यास सांगणाऱ्या बँकांची चौकशी करावी. ४. दोन लाखांच्या आतील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांकडून कोणतीही अतिरिक्त व्याजाची रक्कम बळजबरीने वसूल करू नये.
मागण्या मान्य न झाल्यास संबंधित बँक, सहायक निबंधक किंवा जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड दम देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, चिखली व बुलढाणा पोलिस ठाण्याचे अधिकारी तसेच चिखलीच्या तहसीलदारांनाही पाठवण्यात आली आहे.

