मतदार यादीच्या निमित्ताने २४ वर्षांनी जुळले नाते; प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हरवलेला मुलगा आईच्या कुशीत

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

– SIR प्रक्रियेने जोडली तुटलेली नाती; बीएलओंच्या सतर्कतेमुळे मलकापुरात घडली माय-लेकाची भावूक भेट
– ४०० किमीचा प्रवास अन् आनंदाश्रूंचा बांध; सरकारी कामातून अनुभवाला आला माणुसकीचा ओलावा; डायलिसिसचे उपचार बाजूला सारत धावत आला भाऊ!

बुलढाणा (बाळू वानखेडे) : मतदार यादीचे विशेष पुनरिक्षण (एस.आय.आर.) हे सामान्यतः केवळ एक सरकारी कामकाज म्हणून पाहिले जाते. मात्र, याच शासकीय प्रक्रियेमुळे एका आईची तब्बल चोवीस वर्षांची प्रतीक्षा संपली असून, घर सोडून गेलेला मुलगा पुन्हा आईच्या कुशीत परतला आहे. बुलढाण्यातील मलकापुरात घडलेली ही घटना केवळ अत्यंत भावनिक नसून, शासन व्यवस्थेच्या संवेदनशील चेहऱ्याचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील केडगावचे नवनाथ धोंडीबा गायकवाड हे कौटुंबिक वादानंतर तब्बल चोवीस वर्षांपूर्वी घर सोडून निघून गेले होते. अनेक गावांमध्ये भटकंती केल्यानंतर ते बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरात स्थायिक झाले आणि तिथेच त्यांनी संसारही मांडला. मात्र, मागे त्यांची आई, भाऊ आणि बहीण वर्षानुवर्षे त्यांची वाट पाहत होते.

राज्यात सध्या सुरू असलेल्या एस.आय.आर. (Special Intensive Revision) प्रक्रियेदरम्यान बीएलओ नीता भोंबे आणि सहायक बीएलओ अनिल भोंबे हे माहिती संकलनासाठी नवनाथ गायकवाड यांच्या घरी पोहोचले. कागदपत्रांची पडताळणी करताना नवनाथ यांचे नाव सोलापूरच्या मतदार यादीशी जोडलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी करमाळा येथील बीएलओंशी संपर्क साधला आणि या प्रक्रियेतून तब्बल चोवीस वर्षांपासून हरवलेल्या व्यक्तीचे रहस्य उलगडले.

मुलगा जिवंत असल्याची माहिती मिळताच आई, भाऊ, बहीण आणि इतर नातेवाईकांनी क्षणाचाही विलंब न करता सुमारे ४०० किलोमीटरचा प्रवास केला आणि ते थेट मलकापुरात पोहोचले. रविवारी सकाळी ते अचानक नवनाथ यांच्यासमोर उभे ठाकले. चोवीस वर्षांनंतर आईने आपल्या लेकाला मिठी मारली, तेव्हा आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. ही भेट केवळ माय-लेकाची नसून उपस्थितांच्याही डोळ्यांत पाणी आणणारी ठरली.


भावनिक प्रसंग आणि नातेवाईकांची ओढ

नवनाथ यांच्या पत्नीला सुरुवातीला या संपूर्ण प्रकाराबद्दल काहीच समजले नाही. मात्र, सत्य समोर आल्यानंतर वातावरण अधिकच भावनिक झाले. आईने आपल्या सुनेच्या गळ्यात स्वतःचे सोन्याचे मंगळसूत्र घातले आणि प्रेमाने सोबत गावी चालण्याचा आग्रह धरला. दुसरीकडे, नवनाथ यांचे धाकटे भाऊ अशोक हे डायलिसिससाठी रुग्णालयात दाखल असतानाही, उपचार काही काळ पुढे ढकलून आधी भावाला भेटणे अधिक महत्त्वाचे मानले. रक्ताच्या नात्याची ओढ किती विलक्षण असते, याचे हे जिवंत उदाहरण ठरले.


मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सुरू झालेली ही प्रशासकीय प्रक्रिया एका कुटुंबासाठी आयुष्यभर विसरता ना येणारा क्षण घेऊन आली. सरकारी कागदपत्रांच्या अचूक पडताळणीमुळे आणि दोन्ही जिल्ह्यांतील बीएलओंनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तुटलेले नाते पुन्हा जोडले गेले. मलकापुरातील या घटनेने शासकीय यंत्रणेचा एक अत्यंत संवेदनशील आणि माणुसकीचा चेहरा समाजासमोर आणला आहे.

Share This Article
Exit mobile version