श्री पलसिद्ध महास्वामी मठात २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा महोत्सव; गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सत्कार

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-यूपीएससी, एमपीएससी, नीट तसेच १२ वीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विरशैव समाजातील विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : येथील प्राचीन श्रीमज्जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी सद्धर्मपीठात २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा महोत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विरशैव समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार सोहळाही आयोजित करण्यात आल्याची माहिती मठाच्या वतीने देण्यात आली.

या गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि देशभरातील विविध राज्यांतून हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. यावर्षी प्रथमच यूपीएससी, एमपीएससी, नीट तसेच इयत्ता १२ वीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी २८ जुलैपर्यंत आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन मठ प्रशासनाने केले आहे.

श्रीमद् जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी यांच्या आशीर्वादाने तसेच ष.ब्र.१०८ वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली आणि मठाधिपती ष.ब्र.१०८ वेदांताचार्य सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमानुसार सकाळी ७ वाजता श्रीमद् जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी यांच्या समाधीवर सहस्त्रधारा रुद्राभिषेक, सकाळी ११ वाजता संगीत भजन, दुपारी १२ वाजता सद्गुरूंची पाद्यपूजा, दुपारी १ वाजता पलसिद्ध सभागृहात धर्मसभा आणि दुपारी २ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार सोहळा पार पडणार आहे. या महोत्सवानिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडूसह देशभरातून हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित असून, परिसरातील भाविकांनी या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मठाच्या वतीने करण्यात आले आहे.

Share This Article
Exit mobile version