-सिंदखेडराजातून ‘मिशन २०२७’चा निर्धार; डिसेंबर २०२७ पूर्वी विदर्भ राज्य न झाल्यास तीव्र जनआंदोलनाचा ॲड. वामनराव चटप यांचा इशारा
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : विदर्भातील विकासाचा अनुशेष, वनसंपदा व खनिज संपत्तीची होत असलेली लूट, रखडलेले सिंचन प्रकल्प, वाढता सिंचन अनुशेष, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण, गर्भार मातामृत्यू, बेरोजगारी, युवकांचे स्थलांतर, उद्योगधंद्यांचा अभाव, मोडकळीस आलेली शिक्षण व आरोग्य व्यवस्था, प्रशासनातील सातत्यपूर्ण उपेक्षा तसेच लोकप्रतिनिधित्वात झालेली घट या सर्व प्रश्नांवर स्वतंत्र विदर्भ राज्य हाच एकमेव पर्याय असल्याचा ठाम निर्धार व्यक्त करत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सिंदखेडराजा येथे आयोजित ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा’ उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. विदर्भातील विविध जिल्ह्यांतून आलेले शेतकरी, युवक, महिला, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि विदर्भवादी यांच्या उपस्थितीने हा मेळावा स्वतंत्र विदर्भ चळवळीच्या नव्या टप्प्याची नांदी ठरला.
मेळाव्याच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. नीरज खांदेवाले होते. स्वागताध्यक्ष शिवाजीराजे जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत करून विदर्भाच्या लढ्यासाठी सामाजिक एकजुटीची आवश्यकता अधोरेखित केली. प्रवीण गीते यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. मंजुषा तिरपुडे यांनी सूत्रसंचालन केले. तेजराव मुंढे यांनी आभार मानले. मेळाव्याचे उद्घाटन *देशोन्नती*चे मुख्य संपादक, किसान ब्रिगेडचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या हस्ते झाले. त्यांनी विदर्भातील शेतकरी, बेरोजगार युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर परखड भाष्य करत, “स्वतंत्र विदर्भाशिवाय विदर्भातील जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळणार नाही. अनेक दशकांपासून आश्वासनांचा पाऊस पडला; मात्र विकासाचा लाभ विदर्भापर्यंत पोहोचला नाही. आता जनतेने लोकशाही मार्गाने निर्णायक लढा उभारण्याची वेळ आली आहे,” असे प्रतिपादन केले.
मेळाव्याच्या पहिल्या सत्रात ‘पिक विमा योजनेच्या लाभापासून विदर्भ, विशेषतः बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेला अन्याय’ या विषयावर चर्चा झाली. अध्यक्षस्थानी वामनराव जाधव होते. प्रवीण गीते व बालाजी सोसे यांनी शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्या मांडल्या. उद्योजक दत्तात्रय काकडे यांची विशेष उपस्थिती लाभली. ॲड. रमेश्वर मेहेत्रे यांनी प्रास्ताविक केले, तर पश्चिम विदर्भ युवा आघाडीचे अध्यक्ष संभाजी शिर्के यांनी सूत्रसंचालन केले. दुसऱ्या सत्रात ‘विदर्भातील युवकांसमोरील आव्हाने’ या विषयावर चर्चा झाली. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी अध्यक्ष ॲड. दीपक चटप होते. सुप्रसिद्ध स्तंभलेखक व शिक्षक नेते प्रा. डॉ. प्रशांत विघे यांनी शिक्षण, रोजगार आणि युवकांच्या स्थलांतराच्या प्रश्नांवर सखोल मार्गदर्शन केले. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. रमेश परिहार यांनी केले, तर प्रा. रामदास शिंगणे यांनी आभार मानले.
मेळाव्याच्या अखेरच्या सत्रात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली आणि पद्मश्री डॉ. विकास महात्मे तसेच माजी मंत्री डॉ. रमेश गजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत खुले अधिवेशन पार पडले. पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्राचार्य डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत यांनी प्रास्ताविकातून यापूर्वीच्या सत्रांचा आढावा घेत प्रत्येकाने विदर्भ मुक्तीसाठी आपल्या क्षमतेनुसार कृतिशील कार्यक्रम राबविण्याचे आवाहन केले. त्यानंतर दामोदर शर्मा, तात्यासाहेब मते, सुनील चोखारे, शेतकरी नेते गजानन अहमदाबादकर, अरुणभाऊ केदार आणि महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष मंजुषाताई तिरपुडे यांनी विदर्भाच्या संघटनात्मक बळकटीकरणावर मार्गदर्शन केले. पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी विदर्भातील आरोग्य, शिक्षण आणि विकासाच्या प्रश्नांचा स्वतंत्र विदर्भाशी असलेला संबंध स्पष्ट केला, तर माजी राज्यमंत्री डॉ. रमेश गजबे यांनी विदर्भाच्या सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर भाष्य केले.
अध्यक्षीय समारोपात ॲड. वामनराव चटप यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीची ऐतिहासिक, घटनात्मक आणि आर्थिक बाजू आकडेवारीसह मांडली. त्यांनी सांगितले की, सिंचन अनुशेष, उद्योगधंद्यांतील अपुरी गुंतवणूक, शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण, बेरोजगारी, खनिज आणि वनसंपत्तीचे असमान वितरण तसेच महसूल आणि विकास खर्चातील तफावत यामुळे विदर्भावर सातत्याने अन्याय झाला आहे. स्वतंत्र विदर्भाची मागणी कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नसून संविधानाने दिलेल्या न्याय्य अधिकारांसाठी असल्याचे स्पष्ट करत त्यांनी विदर्भाच्या नैसर्गिक संपत्तीचा योग्य वापर, स्थानिकांना रोजगार, सिंचन व्यवस्था, उद्योगनिर्मिती आणि संतुलित विकासासाठी स्वतंत्र राज्य अपरिहार्य असल्याचे ठामपणे सांगितले.
यावेळी त्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले, “डिसेंबर २०२७ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती झालीच पाहिजे. अन्यथा विदर्भातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावात व्यापक जनआंदोलन उभारले जाईल. हा लढा कोणत्याही व्यक्तीचा नसून विदर्भातील शेतकरी, युवक, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांचा आहे.” तसेच ‘मिशन २०२७’ अंतर्गत गावागावांत जनसंपर्क, संघटनात्मक बांधणी आणि व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद देत “जय विदर्भ… जय जय विदर्भ…” अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.
मुख्य खुल्या अधिवेशनाचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप नाईकवाड यांनी केले, तर डॉ. शिवाजी खरात यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी प्रा. शरद पुसदकर यांनी विदर्भावरील कविता सादर केली. मेळाव्याच्या शेवटी उपस्थितांनी स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीसाठी गावागावांत जनजागृती करण्याचा, संघटन अधिक मजबूत करण्याचा आणि ‘मिशन २०२७’ यशस्वी करण्याचा सामूहिक संकल्प केला. सिंदखेडराजातून दिलेला हा संदेश स्वतंत्र विदर्भ राज्य चळवळीच्या पुढील वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

