-महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना निवेदन; विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी केलेल्या सेवाभावी कार्याची दखल घेण्याची अपेक्षा
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : “शासकीय सेवेत असलेला प्रत्येक कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी असतो; मात्र काही अधिकारी-कर्मचारी आपल्या कर्तव्यापलीकडे जाऊन लोकाभिमुख सेवा देत समाजात वेगळी ओळख निर्माण करतात.” सिंदखेडराजा तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक (सेतू लिपिक) संजय संतोबा सोनुने हे अशाच कर्मचाऱ्यांपैकी एक असून, त्यांच्या प्रामाणिक, सेवाभावी आणि लोकाभिमुख कार्याची दखल घेत त्यांना १ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘महसूल दिना’निमित्त ‘उत्कृष्ट महसूल पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी सिंदखेडराजा तालुक्यातील पत्रकार बांधवांनी केली आहे.
यासंदर्भात बुलढाणा जिल्हाधिकारी, सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना संयुक्त निवेदन सादर करण्यात आले असून, महसूल विभागातील उत्कृष्ट व नागरिकाभिमुख सेवेचा गौरव व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संजय सोनुने हे आपल्या पदाची जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे आणि संवेदनशीलतेने पार पाडत आहेत. तहसील कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला वेळेत सेवा मिळावी, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, मिळकतीचे प्रमाणपत्र आणि शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र यांसारखे विविध दाखले वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. संजय सोनुने यांच्या कार्यातील विशेष बाब म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी दाखविलेली कर्तव्यनिष्ठा. ३० मार्च २०२६ रोजी आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी सेतू प्रणालीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली असताना अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे प्रलंबित होती. अशा परिस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अथक प्रयत्न करून एका दिवसात तब्बल १९७ प्रमाणपत्रांचे वितरण केले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच आर्थिक नुकसान टळल्याचे पत्रकारांनी नमूद केले आहे. याशिवाय, जून महिन्यात महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेच्या काळात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही त्यांनी मोबाईलचा टॉर्च आणि हॉटस्पॉटचा वापर करून नागरिकांची कामे सुरू ठेवली. विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळावेत, यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे उदाहरण असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनानुसार १ जून २०२६ ते २० जुलै २०२६ या अवघ्या दीड महिन्यांच्या कालावधीत संजय सोनुने यांच्या माध्यमातून ५,४०८ ऑनलाइन प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देणे ही महसूल विभागातील प्रभावी आणि लोकाभिमुख प्रशासनाची उल्लेखनीय कामगिरी असल्याचे पत्रकारांनी अधोरेखित केले आहे. शासकीय जबाबदाऱ्यांसोबतच त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीने मदत करणे, तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान प्रसारमाध्यमांशी समन्वय साधून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करणे, अशा अनेक कार्यांमुळे त्यांनी कर्तव्यदक्ष आणि समाजाभिमुख कर्मचारी म्हणून विश्वास संपादन केला आहे.
नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. अशा कर्मचाऱ्यांचा गौरव झाल्यास महसूल विभागातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही अधिक लोकाभिमुख आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याची प्रेरणा मिळेल. त्यामुळे १ ऑगस्ट रोजीच्या ‘महसूल दिना’ निमित्त संजय संतोबा सोनुने यांना ‘उत्कृष्ट महसूल पुरस्कार’ प्रदान करून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात यावा, अशी मागणी सिंदखेडराजा तालुक्यातील पत्रकार बांधवांनी सह्यांसह प्रशासनाकडे केली आहे. पत्रकारांनी व्यक्त केलेल्या या मागणीमुळे महसूल विभागात प्रामाणिकपणे आणि नागरिकाभिमुख पद्धतीने कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याला योग्य दाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अशा सेवाभावी कर्मचाऱ्यांचा गौरव हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून लोककेंद्रित प्रशासनाच्या मूल्यांना मिळालेली खरी पावती ठरेल.

