देवशयनी एकादशीनिमित्त हरिनामाच्या गजरात इंद्रायणी आरती

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-हजेरी मारुती मंदिरात माऊलींच्या पालखीचे आगमन; कीर्तन, आरती व प्रसाद वाटपाने भक्तिमय वातावरण

आळंदी (अर्जुन मेदनकर) : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त येथील इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती सेवा समितीच्या वतीने हरिनामाच्या गजरात इंद्रायणी आरती करण्यात आली. पहाटेपासूनच परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. महिला साधकांनी आकर्षक रांगोळ्या काढून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

यावेळी माऊलींची पालखी हरिनामाच्या जयघोषात हजेरी मारुती मंदिरात विसावली. इंद्रायणी नदीला महापूर आल्याने पालखीचा मार्ग रामघाटातून वळविण्यात आला. ग्रामप्रदक्षिणेदरम्यान युवा कीर्तनकार चक्रांकित महाराज यांनी कीर्तन सेवेचा प्रारंभ केला. हजेरी मारुती मंदिरात भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिरात देवस्थानचे वाटणे मानकरी, सेवक, खांदेकरी आणि ग्रामस्थांचा नारळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. आळंदीकर ग्रामस्थ आणि खांदेकऱ्यांनी परंपरेनुसार माऊलींची पालखी खांद्यावर घेत ग्रामप्रदक्षिणा पूर्ण केली. विविध ठिकाणी पालखीचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.

श्री हजेरी मारुती मंदिरात नित्यनैमित्तिक आरती, हनुमान स्तोत्र, हनुमान चालीसा तसेच प्रसाद वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. मंदिर परिसरातील सर्व नियोजन आळंदीकर ग्रामस्थ आणि नवशिवशक्ती तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. दरम्यान, इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे घाटावर भाविकांना जाण्यास प्रशासनाने मनाई केली होती. त्यामुळे मोजक्या महिला साधकांच्या उपस्थितीत इंद्रायणी आरती पार पडली. आरतीनंतर भाविकांना उपवासाचे पदार्थ व केळींचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अनिता झुजम, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, सावित्री घुंडरे, पुष्पा लेंडघर, नीलम कुरधोंडकर, शोभा कुलकर्णी, सरस्वती भागवत, भागीरथी भागवत, उषा पाटील, स्वाती पाचुंदे, जयश्री मुसळे, सुरेखा कुऱ्हाडे, सुवर्णा काळे, अपूर्वा भागवत, माऊली घुंडरे पाटील, राजेश नागरे, सोमनाथ बेंडाले, अमर गायकवाड, बाबुराव मोरे, गोविंद ठाकूर आदी उपस्थित होते. दर एकादशीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या इंद्रायणी आरतीला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हरिनामाच्या अखंड गजराने आणि धार्मिक वातावरणाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

Share This Article
Exit mobile version