‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए!’; ‘जंतर-मंतर’वर विद्यार्थ्यांचा जल्लोष; आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांसाठी १ कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी
नवी दिल्ली (आवेश तिवारी) : ‘या सरकारमध्ये कुणाचे राजीनामे घेतले जात नाहीत’, हा मोदी सरकारचा आणि प्रशासनाचा अहंकार अखेर ‘झुरळां’नी (कॉकरोच) मोडून काढला आहे. ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून गेले ३६ दिवस जंतरमंतरवर धडक देणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आक्रमक रेट्यासमोर केंद्र सरकारला अखेर नमते घ्यावे लागले असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना लाजीरवाण्या स्थितीत पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या राजीनाम्यामुळे अभेद्य समजल्या जाणाऱ्या मोदी सरकारच्या कार्यप्रणालीला मोठा हादरा बसला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतरमंतरवर ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी ‘छात्र एकता झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या, तसेच नीट पेपरफुटीच्या नैराश्यातून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर जंतरमंतरवर बोलताना ‘कॉकरोच जनता पार्टी’चे प्रमुख अभिजीत दीपके यांनी सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “लोक म्हणायचे की या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत. पण, झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए! गेले महिनाभर लोक मला विचारत होते की, इथे बसून काय होणार? हे मनमानी सरकार आहे, ते राजीनामा देणार नाहीत. पण, आम्ही ते करून दाखवलं.”
पदावरून पायउतार होताना धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर दोन पानांचे आणि ५७५ शब्दांचे राजीनामा पत्र पोस्ट केले. मात्र, यात स्वतःचे आणि व्यवस्थेचे अपयश स्वीकारण्याऐवजी त्यांनी दोन ठिकाणी ‘युवकांची दिशाभूल’ केली जात असल्याचा कांगावा करत खापर दुसऱ्यांवर फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
एका मंत्र्याचा बळी घेतला असला तरी सीजेपीचा लढा इथेच थांबणार नसल्याचे दीपके यांनी स्पष्ट केले. “मंत्र्याचा राजीनामा झाला, पण आमच्या आणखी दोन मागण्या आहेत. आम्ही असेच रिकाम्या हाताने जाणार नाही. कॉकरोच एकदा घुसला की तो सहजासहजी बाहेर पडत नाही,” असा सज्जड दम त्यांनी सरकारला दिला.
सीजेपीच्या प्रमुख मागण्या:
- आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळावी.
- आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लादलेले सर्व गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत.
- दडपशाही करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी.
आपल्या आक्रमक शैलीत बोलताना दीपके यांनी दिल्ली पोलिसांनाही थेट लक्ष्य केले. “दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी हे कायम लक्षात ठेवावे की त्यांनी कॉकरोचशी पंगा घेतला आहे. आम्ही जर एका केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यायला भाग पाडून घरी बसवू शकतो, तर तुमची काय बिशाद? हा लोकशाही देश आहे, इथे दडपशाही खपवून घेतली जाणार नाही,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
प्रधानांच्या राजीनाम्यापूर्वीच शिक्षण मंत्रालयात आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये (NTA) मोठी उलथापालथ सुरू झाली होती. शुक्रवारी रात्री उशिरा ‘एनटीए’च्या तब्बल ४७ अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले असून, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुरुवारीच सरकारने शिक्षण मंत्रालयातील दोन सचिवांच्या बदल्या केल्या होत्या. भविष्यात पेपरफुटीला आळा घालण्यासाठी एनटीएमध्ये मोठे तांत्रिक आणि प्रशासकीय बदल केले जाणार आहेत. आउटसोर्सिंगची व्यवस्था बदलण्यासोबतच, यूपीएससीच्या ‘प्रतिभा सेतू पोर्टल’च्या माध्यमातून ४ वरिष्ठ महाव्यवस्थापक (General Manager) आणि १६ युवा व्यावसायिकांची (Young Professionals) नियुक्ती केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

