आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलनामाच्या गजरात देऊळगाव घुबेत भव्य दिंडी सोहळा

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूल व जानकीदेवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साकारली संत परंपरा; ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले

चिखली (राजेंद्र घुबे): देऊळगाव घुबे येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूल व जानकीदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त २४ जुलै रोजी विठ्ठल-रखुमाईच्या भक्तिमय वातावरणात भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९ वाजता “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या गजरात निघालेल्या या दिंडीने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले.

दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रखुमाई तसेच विविध संतांची आकर्षक वेशभूषा साकारली होती. शाळेपासून सुरू झालेली ही दिंडी गावातील मुख्य रस्ते व प्रत्येक गल्लीमधून मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. तेथे विद्यालयाचे माजी प्राचार्य हरिदासजी घुबे आणि प्राचार्य बबनराव लांडगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज तसेच विदर्भ संत श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यानंतर विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात विठू माऊलीच्या नामस्मरणासह पारंपरिक पावल्यांचे सादरीकरण केले. बालगोपालांनी फुगडी खेळून आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविले. गावातील महिलांनी पालखीचे तसेच विठ्ठल-रखुमाईची वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांचे पूजन करून दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले.  या दिंडी सोहळ्यात रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूल व जानकीदेवी विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह गावातील महिला मंडळ, वारकरी संप्रदायातील भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. चिमुकल्यांनी साकारलेल्या संत परंपरेचे सर्वांनी मनापासून कौतुक केले.

कार्यक्रमाला भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेणफडरावजी घुबे पाटील, सचिव प्रा. उद्धवराव घुबे, प्राचार्य बबनराव लांडगे, प्राचार्य अमोल घुबे, माजी प्राचार्य हरिदासजी घुबे, रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूलचे प्राचार्य अमोल घुबे तसेच ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे सचिव प्रा. उद्धवराव घुबे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थापक अध्यक्ष शेणफडरावजी घुबे यांनी सर्व शिक्षक, कर्मचारी आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Share This Article
Exit mobile version