दिल्लीतील विद्यार्थी लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बिबी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-शांततापूर्ण बंदासाठी पोलिस प्रशासनाला निवेदन; व्यापारी, विविध संघटना व नागरिकांचा स्वयंस्फूर्त सहभाग

बिबी (ऋषी दंदाले) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी बिबी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत शहरातील व्यापारी, विविध सामाजिक-राजकीय संघटना, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. बंद शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने पार पडावा, यासाठी आंदोलनाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून बिबी पोलिस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवून, न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे हे लोकशाही मूल्यांना धरून नसल्याचे नमूद करण्यात आले. शासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे संवेदनशीलतेने पाहून तातडीने न्याय द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. तसेच आंदोलन पूर्णपणे शांततेच्या आणि संविधानिक मार्गाने पार पाडण्यात येईल, अशी ग्वाही पोलिस प्रशासनाला देण्यात आली. या निवेदनावर वंचित बहुजन युवा आघाडी, लोणारचे उपाध्यक्ष प्रविण बनसोडे, सचिव मतीन सय्यद, सदस्य भगवान साळवे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे जाकीर शेख, आकाश बनकर, प्रशांत बनकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद इंगळे यांच्यासह अजय साळवे, राजेश हिवाळे, राहुल इंगळे, सचिन निकाळजे, भारतीय बौद्ध महासभेचे विजय वाघ, मारोती इंगळे, प्रशांत इंगळे, अरबाज सय्यद, पंचशील हिवाळे, आदित्य इंगळे, विनोद साळवे, इरफान शेख, प्रेम साळवे, किशोर इंगळे, तन्वीर शेख, संतोष चव्हाण, रामप्रसाद साळवे, अनावर शेख, बंटी अंभोरे, इमरान शेख, मयूर वाकोडे, राहुल काळे, शरद अंभोरे, सलमान शेख, विक्की इंगळे, अक्षय बनसोडे, तोसिफ शेख व उमेश इंगळे यांनी स्वाक्षऱ्या करून पाठिंबा दर्शविला.

यावेळी प्रविण बनसोडे म्हणाले, “विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे ही अत्यंत दुर्दैवी घटना असून लोकशाहीला काळिमा फासणारी आहे. आमचा लढा कोणत्याही राजकीय हेतूने नसून विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आहे. बिबीकरांनी शांततेच्या आणि संविधानिक मार्गाने बंदला दिलेला प्रतिसाद लोकशाहीवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे.” बंदला व्यापारी, विद्यार्थी, पालक, युवक तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद राहिली. मात्र अत्यावश्यक सेवांमध्ये दवाखाने, औषधालये तसेच शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषी सेवा केंद्रे सुरू ठेवण्यात आली. मुख्य बाजारपेठेसह शहरातील विविध भागांत शुकशुकाट पाहावयास मिळाला. आंदोलनकर्त्यांनी कोणताही अनुचित प्रकार न घडता संपूर्ण बंद शांततापूर्ण वातावरणात पार पडल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज असल्याची भावना व्यक्त करत, भविष्यातही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

Share This Article
Exit mobile version