-खामगाव विधानसभा मतदारसंघ अव्वल; गृहभेटीची मोहीम ८ ऑगस्टपर्यंत वाढविली, पात्र नागरिकांना सहकार्याचे आवाहन
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार गणनापत्र (Enumeration Forms) डिजिटायझेशन मोहिमेत बुलढाणा जिल्ह्याने ७०.६६ टक्के प्रगती नोंदविली आहे. जिल्ह्यातील एकूण २० लाख ८९ हजार ९६५ मतदारांपैकी १४ लाख ७६ हजार ८१५ मतदारांचे गणनापत्र ऑनलाइन डिजिटायझेशन करण्यात आले आहे. उर्वरित मतदारांचे गणनापत्र लवकरात लवकर ऑनलाइन नोंदविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.
दरम्यान, मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत राबविण्यात येणारी गृहभेट मोहीम आता ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. पात्र नागरिकांनी या कालावधीत गणना प्रपत्र भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी निवडणूक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना ८ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असून, १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान नोटिसा, सुनावणी आणि दावे-हरकतींचा निपटारा करण्यात येईल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

