विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ लोणार बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-व्यापारी, दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांसह विविध संघटनांचा सहभाग; काही आस्थापना दिवसभर बंद

लोणार (वाजिद खान) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या लोणार बंदला शहरातील व्यापारी, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक तसेच विविध संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत बहुतांश दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविण्यात आला, तर काही व्यापाऱ्यांनी दिवसभर व्यवहार बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज व कारवाईच्या निषेधार्थ शहरात विविध ठिकाणी जनजागृती करण्यात आली. वंचित बहुजन आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांची भेट घेऊन दिल्लीतील घटनेचा निषेध म्हणून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन जाधव आणि वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष गौतम गवई यांनी केले. यावेळी तानाजी अंभोरे, श्रीकांत मदनकर, सुदाम अंभोरे, विजय घोडके, भारत राठोड, योगेश भक्कम, एकबाल कुरेशी, गौतम मोरे, प्रा. इंगळे, गवळी सर यांच्यासह शिवसेना व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

लोणार बंदच्या आवाहनाला शहरातील व्यापारी, हॉटेल चालक, भाजी विक्रेते तसेच लहान-मोठ्या व्यावसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सकाळी तीन तास दुकाने बंद ठेवून विद्यार्थ्यांवरील कथित कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला. काही व्यापाऱ्यांनी दिवसभर आस्थापना बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दिल्याने शहरात बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Share This Article
Exit mobile version