शेवगाव आगारात नव्या ५ ‘राजमाता जिजाऊ’ बस दाखल; उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-आमदार मोनिकाताई राजळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; ग्रामीण प्रवाशांचा प्रवास होणार अधिक सुरक्षित व आरामदायी

शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : आषाढी एकादशीपूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शेवगाव आगारात बीएस-६ तंत्रज्ञानावर आधारित नव्या पाच ‘राजमाता जिजाऊ’ बस दाखल झाल्या असून, या बस उद्यापासून नियमित प्रवासी सेवेत दाखल होणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

शेवगाव व पाथर्डी आगारासाठी प्रत्येकी १० नवीन बस उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार मोनिकाताई राजळे यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने लावून धरली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळत पहिल्या टप्प्यात शेवगाव आगारासाठी पाच नवीन बस मंजूर करण्यात आल्या असून त्या आगारात दाखल झाल्या आहेत. उर्वरित बसही दोन्ही आगारांसाठी लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली. सध्या शेवगाव आगारात ५२ बस कार्यरत असून, या बसमधून दरवर्षी सुमारे सहा लाख प्रवासी प्रवास करतात. अनेक बस जुन्या झाल्याने वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून नवीन बस उपलब्ध करून देण्यासाठी आमदार मोनिकाताई राजळे यांनी सातत्याने प्रयत्न केले होते.

यापूर्वीही त्यांच्या प्रयत्नांतून बीएस-६ प्रकारातील अशोक लेलँड कंपनीच्या १० नवीन बस शेवगाव आगाराला मिळाल्या होत्या. त्यापैकी ११ फेब्रुवारी २०२५ रोजी पाच आणि ५ मार्च २०२५ रोजी आणखी पाच बस आगारात दाखल झाल्या होत्या. आता नव्याने पाच बस दाखल झाल्याने आगाराच्या ताफ्यात आणखी भर पडली आहे. यावेळी आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या की, राज्य शासनाच्या माध्यमातून शेवगाव आगाराचे शेड आणि बसस्थानकाचे काम पूर्णत्वास आले आहे. नव्याने दाखल झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ बीएस-६ बस ग्रामीण भागातील प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आल्या असून, त्या आधुनिक सुविधा, आरामदायी आसनव्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक सक्षम आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार राजळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शेवगाव आगारासाठी नवीन बस उपलब्ध करून देण्यासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच उर्वरित बसही लवकरच उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवीन बस आगारात दाखल झाल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, आमदार मोनिकाताई राजळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शेवगाव आगाराच्या सुविधांमध्ये होत असलेल्या वाढीबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त करत त्यांचे तसेच महायुती सरकारचे आभार मानले.

Share This Article
Exit mobile version