भेटी लागे जीवा…

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-वारी – एकात्मतेची, सौख्याची आणि समाधानाची अखंड परंपरा

आषाढी वारी म्हणजे केवळ पंढरपूरची यात्रा नव्हे, तर ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि समतेचा जिवंत उत्सव आहे. आज वारीच्या प्रत्येक वाटेवर भक्तीरस ओसंडून वाहत आहे. गाव लहान असो वा मोठे, प्रत्येक ठिकाणी टाळ-मृदुंगाचा गजर, भगव्या पताका, रांगोळ्या, फुलांची सजावट आणि “रामकृष्ण हरी”च्या अखंड नामघोषाने वातावरण भारावून गेले आहे. आषाढी एकादशी जसजशी जवळ येत आहे, तसतशी वारकऱ्यांची श्री विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ अधिकच तीव्र होत आहे.

वारकऱ्यांसाठी पंढरपूर म्हणजे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर ती त्यांच्या जीवनाची ऊर्जा आहे. श्री विठ्ठलाच्या भेटीची आस त्यांच्या प्रत्येक श्वासात भरलेली असते. ही तळमळ संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत व्यक्त केली आहे. चकोर जसा पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहतो, दिवाळीत माहेरच्या बोलावण्याची जशी लेकीला ओढ लागते, किंवा भुकेलेले बाळ जसे आईसाठी व्याकूळ होते, तशीच अवस्था विठ्ठल भेटीसाठी वारकऱ्यांची झालेली असते.

भेटी लागी जीवा लागलीसे आस
पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥

पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन
तैसे माझे मन वाट पाही ॥

दिवाळीच्या मुळा लेकी आसावली
पाहतसे वाटूनी पंढरीसी ॥

भुकेलिया बाळा अति शोक करी
वाट पाहे परी माऊलीची ॥

तुका म्हणे मज लागलीसे भूक
धावूनी श्रीमुख दावी देवा ॥

या अभंगातील प्रत्येक ओळ वारकऱ्यांच्या अंतःकरणातील विठ्ठलभक्तीचे दर्शन घडवते. वारी म्हणजे चालण्याचा प्रवास नसून आत्म्याचा परमात्म्याकडे जाणारा मार्ग आहे. या मार्गावर जात, धर्म, पंथ, श्रीमंती-गरिबी यांचे भेद नाहीत. सर्वजण एकाच माऊलीच्या चरणी लीन होतात. म्हणूनच वारी ही एकात्मतेची, समतेची, प्रेमाची आणि मानवतेची अखंड परंपरा आहे.

रामकृष्ण हरी… जय जय रामकृष्ण हरी!

Share This Article
Exit mobile version