बुलढाणा जिल्हा बँकेचे रणशिंग फुंकले; डॉ. शिंगणेंची सत्ता राखण्यासाठी कसोटी!

admin Add a Comment 4 Min Read
4 Min Read

– बँकेच्या आर्थिक डबघाईवरून विरोधक आक्रमक; सहकारातील सत्तेच्या चाव्या कुणाकडे?
– शिंगणे घराण्याची मक्तेदारी धोक्यात?; प्रतापराव जाधव, श्वेताताई महाले, आकाश फुंडकर यांचे आव्हान?

बुलढाणा (बाळू वानखेडे) – ‘जिल्हा बँक ज्यांच्या ताब्यात, त्याचे जिल्ह्यावर वर्चस्व’ हे सूत्र बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात वर्षानुवर्षे रूढ आहे. याच वर्चस्वाच्या लढाईसाठी दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या (२०२६ ते २०३१) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, प्रस्थापित विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची स्थापना १९६२ मध्ये झाली असून, तब्बल १८ वर्षांनंतर ही निवडणूक होत आहे. या बँकेवर अनेक दशकांपासून माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या कुटुंबीयांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. एकेकाळी सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे यांनी या बँकेवर एकहाती सत्ता राखत जिल्ह्याचे अर्थकारण आपल्या ताब्यात ठेवले होते. मात्र, डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या कार्यकाळात बँक मोठ्या आर्थिक डबघाईस आली. ठेवीदारांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण झाल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे.

या पार्श्वभूमीवर अत्यंत प्रतिकूल राजकीय आणि आर्थिक परिस्थितीत डॉ. शिंगणे ही बँक पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यात यशस्वी ठरतील का, हा आता सर्वात महत्त्वाचा कळीचा मुद्दा बनला आहे. आर्थिक अडचणींमुळे गेल्या १२ वर्षांपासून बंद पडलेल्या जिल्हा सहकारी बँकेला केंद्र व राज्य शासनाच्या मदतीमुळे नवसंजीवनी मिळाली असून, प्रशासकाच्या नियंत्रणाखाली सध्या ही बँक २३ कोटी रुपयांहून अधिक नफ्यात असल्याचे सांगितले जात आहे.

बँक ताब्यात घेणाऱ्या गटाचे जिल्ह्याच्या राजकारणावर थेट वर्चस्व प्रस्थापित होत असल्याचे ओळखून सत्ताधाऱ्यांनीही कंबर कसली आहे. जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रात मंत्रिपद मिळवलेले शिवसेना (शिंदे गट)चे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव या निवडणुकीत कोणता राजकीय करिष्मा दाखवतील, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जाधव गटाचा वाढलेला आत्मविश्वास जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांना यश मिळवून देतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दुसरीकडे, भाजपच्या आक्रमक नेत्या आणि आमदार श्वेताताई महाले तसेच भाजपचे मंत्री आकाश फुंडकर हेदेखील या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद पणाला लावण्याची शक्यता आहे. भाजपच्या वाढत्या प्रभावाचा फायदा घेत बँकेत कमळ फुलवण्यासाठी त्यांची रणनीती निर्णायक ठरू शकते. या बहुरंगी राजकीय नाट्यात काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ काय भूमिका घेणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीचे मित्रपक्ष म्हणून ते डॉ. शिंगणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार की स्थानिक राजकारणाच्या गणितांनुसार वेगळी खेळी करणार, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

असा आहे निवडणूक कार्यक्रम :

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मान्यता दिलेल्या कार्यक्रमानुसार, २० जुलै रोजी विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार २४ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. २५ जुलै रोजी अर्जांची छाननी होईल, तर २७ जुलै रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली असून, त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.

आवश्यकता भासल्यास २३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होईल. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी मतमोजणी होऊन सहकाराचा नवा कारभारी कोण, याचा फैसला होईल. तालुकानिहाय १३ मतदारसंघ आणि इतर राखीव मतदारसंघांतील समीकरणांवर सर्वच नेत्यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असून, बुलढाणा जिल्ह्यात राजकीय शह-काटशहाच्या राजकारणाला उधाण आले आहे.

Share This Article
Exit mobile version