बुलढाणा जिल्हा बँकेचे रणशिंग फुंकले; डॉ. शिंगणेंची सत्ता राखण्यासाठी कसोटी!

admin Add a Comment 4 Min Read
4 Min Read

– बँकेच्या आर्थिक डबघाईवरून विरोधक आक्रमक; सहकारातील सत्तेच्या चाव्या कुणाकडे?
– शिंगणे घराण्याची मक्तेदारी धोक्यात?; प्रतापराव जाधव आणि श्वेताताई महालेंचे आव्हान?

बुलढाणा (बाळू वानखेडे) – ‘जिल्हा बँक ज्यांच्या ताब्यात, त्याचे जिल्ह्यावर वर्चस्व’ हे सूत्र बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात वर्षानुवर्षे रूढ आहे. याच वर्चस्वाच्या लढाईसाठी दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या (२०२६ ते २०३१) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, प्रस्थापित विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची स्थापना १९६२ मध्ये झालीं असून तब्बल १८ वर्षांनंतर निवडणूक होत आहे. या बँकेवर अनेक दशकांपासून माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या कुटुंबीयांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. एकेकाळी सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे यांनी या बँकेवर एकहाती सत्ता ठेवली होती आणि जिल्ह्याचे अर्थकारण आपल्या हाती राखले होते. मात्र, डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याच कार्यकाळात बँक मोठ्या आर्थिक डबघाईस आली. ठेवीदारांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण झाल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर, अत्यंत प्रतिकूल राजकीय आणि आर्थिक परिस्थितीत डॉ. शिंगणे ही बँक पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यात यशस्वी होतील का, हा आता सर्वात मोठा कळीचा मुद्दा बनला आहे. आर्थिक अडचणींमुळे गेल्या १२ वर्षांपासून बंद पडलेल्या जिल्हा सहकारी बँकेला केंद्र व राज्य शासनाच्या मदतीमुळे नवसंजीवनी संजीवनी मिळाली असून, प्रशासकाच्या नियंत्रणाखाली सध्या सदर बँक २३ कोटीचे वर नफ्यात असल्याचे सांगितले जात आहे.

बँक ताब्यात घेणाऱ्या गटाचे जिल्ह्याच्या राजकारणावर थेट वर्चस्व प्रस्थापित होते, हे ओळखून सत्ताधाऱ्यांनीही कंबर कसली आहे. जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रात मंत्रिपद मिळवलेले शिवसेना (शिंदे गट) नेते व केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव या निवडणुकीत काय राजकीय करिष्मा दाखवतील, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जाधव गटाचा वाढलेला आत्मविश्वास जिल्हा बँकेत त्यांना यश मिळवून देतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दुसरीकडे, भाजपच्या आक्रमक नेत्या आणि आमदार श्वेताताई महाले यादेखील या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद पणाला लावण्याची शक्यता आहे. भाजपच्या वाढत्या प्रभावाचा फायदा घेत बँकेत कमळ फुलवण्यासाठी त्यांची रणनीती निर्णायक ठरू शकते. या बहुरंगी राजकीय नाट्यात काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महाविकास आघाडीचे मित्रपक्ष म्हणून ते डॉ. शिंगणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार की स्थानिक राजकारणाच्या गणितांनुसार वेगळी खेळी करणार, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

असा आहे निवडणूक कार्यक्रम:
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मान्यता दिलेल्या कार्यक्रमानुसार, २० जुलैला विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये २४ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. २५ जुलैला अर्जांची छाननी, तर २७ जुलैला वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदत असून, त्याच दिवशी अंतिम यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. आवश्यकता भासल्यास २३ ऑगस्टला सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होईल आणि २४ ऑगस्टला मतमोजणी होऊन सहकाराचा नवा कारभारी कोण, याचा फैसला होईल. तालुकानिहाय १३ मतदारसंघ आणि इतर राखीव मतदारसंघांतील समीकरणांवर सर्वच नेत्यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असून, बुलढाण्यात राजकीय शह-काटशहाच्या राजकारणाला उधाण आले आहे.

((चौकट))

बुलढाणा जिल्हा बँक : १८ वर्षांनंतर निवडणुकीचे बिगुल!

बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेची स्थापना १९६२ साली झाली आहे. आता तब्बल १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या बँकेची निवडणूक पार पडत आहे. या प्रदीर्घ काळानंतर होत असलेल्या निवडणुकीमुळे बँकेच्या सत्तासंघर्षाचे वेध लागले असून, राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Share This Article
Exit mobile version