-‘सर्वांच्या आपुलकीचा माणूस म्हणजे मामा’; सेवावृत्ती हीच त्यांची खरी ओळख – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माता म्हणून तब्बल ४० वर्षे निस्वार्थ सेवा बजावणारे गोपाल ‘मामा’ मानतकर यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त मित्रमंडळ आणि भूमिपुत्र वैद्यकीय मदतकक्ष, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच केंद्रीय आयुष मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात हजारो रुग्णांनी विविध वैद्यकीय सेवांचा लाभ घेतला.
माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपल्या मनोगतात मानतकर कुटुंबाच्या सामाजिक आणि वैद्यकीय सेवेचा गौरव केला. “स्वर्गीय डॉ. सुखदेव मानतकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत घोड्यावरून दुर्गम भागात जाऊन आरोग्यसेवा दिली. त्याच सेवाभावी परंपरेचा वारसा गोपाल मानतकर यांनी पुढे चालविला. साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी रुग्णांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. त्यामुळे ‘गोपाल मामा आहेत ना, मग सर्व काही ठीक आहे,’ असा विश्वास रुग्णांच्या मनात निर्माण झाला होता. ते सेवेतून निवृत्त झाले असले तरी सेवाभावातून कधीच निवृत्त होणार नाहीत,” असे ते म्हणाले. या महाआरोग्य शिबिरात नेत्रतपासणी, मोफत चष्मे वाटप, रक्तदान शिबिर तसेच विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना मोफत औषधांचेही वितरण करण्यात आले. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि हजारो रुग्णांनी विविध वैद्यकीय सुविधांचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुनील रिंढे, सोमेश्वर इंगळे, शरद इंगळे, शरद मानतकर आणि मित्रमंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. युवासेना नेते योगेश जाधव यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैष्णवी सिनगारे यांनी केले, तर सूत्रसंचालन अजिम नवाज राही यांनी केले.

