ग्रामीण कन्येची NEET-UG 2026 मध्ये दैदिप्यमान कामगिरी; गायत्री सुसेला 570 गुण

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनीची 98.81 पर्सेंटाइलसह ऑल इंडिया ओबीसी रँक 11,210; वैद्यकीय शिक्षणाच्या स्वप्नाला बळ

शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील शेतकरी कुटुंबातील कु. गायत्री सावता सुसे हिने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG) 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे. तिने 720 पैकी 570 गुण मिळवत 98.8143878 पर्सेंटाइल प्राप्त केले असून ओबीसी (नॉन-क्रीमी लेयर) प्रवर्गातून ऑल इंडिया रँक 11,210 मिळवली आहे.

गायत्रीच्या या यशामुळे बोधेगावसह संपूर्ण शेवगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याच्या तिच्या स्वप्नाला या यशामुळे मोठी चालना मिळाली आहे. गायत्रीचे प्राथमिक शिक्षण पार्थ पब्लिक स्कूल व शिवाजी हायस्कूल, बोधेगाव येथे झाले. त्यानंतरचे माध्यमिक शिक्षण तिने जवाहर नवोदय विद्यालय, टाकळी ढोकेश्वर येथे पूर्ण केले. दहावीनंतर वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी तिने लातूर येथील आरसीसी (RCC) क्लासेसमध्ये प्रवेश घेत कठोर परिश्रम केले.

या यशामागे तिची जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आई उषा सुसे तसेच वडील सावता सुसे यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन व मानसिक बळ महत्त्वाचे ठरल्याचे गायत्रीने सांगितले. गायत्रीच्या या यशाबद्दल नातेवाईक, शिक्षक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तिचे यश प्रेरणादायी ठरत असून, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर मोठे ध्येय गाठता येते, हे तिने सिद्ध करून दाखविले आहे.

Share This Article
Exit mobile version