रासायनिक मिठाईचा गोडवा की विषारी फसवणूक?; चिखलीतील स्वीटमार्ट्सवर कारवाईची मागणी

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-निकृष्ट ‘अहमदाबादी बर्फी’पासून पेढे तयार करून ग्राहकांची फसवणूक; विनायक सरनाईक यांची जिल्हाधिकारी व अन्न-औषध प्रशासनाकडे धडक

चिखली (अंकुश पाटील) : चिखली शहरासह बुलढाणा जिल्ह्यातील विविध स्वीटमार्ट्समध्ये निकृष्ट दर्जाची मिठाई विक्री होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. अत्यंत स्वस्त आणि निकृष्ट दर्जाच्या ‘अहमदाबादी बर्फी’पासून तयार केलेले पेढे शुद्ध ‘मलाई पेढा’ असल्याचे भासवून ग्राहकांना चढ्या दराने विकले जात असल्याचा आरोप विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी जिल्हाधिकारी तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्तांकडे निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली.

सरनाईक यांनी निवेदनात म्हटले आहे की, काही स्वीटमार्ट चालक नफेखोरीच्या उद्देशाने ग्राहकांची दिशाभूल करत असून रासायनिक प्रक्रियेद्वारे तयार केलेला बनावट खवा व भेसळयुक्त खाद्यपदार्थ खुलेआम विकले जात आहेत. विशेष म्हणजे, ग्राहकांना खरेदीचे पक्के बिलही दिले जात नसल्याने नियमांची सर्रास पायमल्ली होत असून नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू आहे. यासंदर्भात १५ जुलै २०२६ रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश थुट्टे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी तसेच अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्री. पाटील यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनामध्ये चिखली शहरातील रासायनिक प्रक्रियेद्वारे तयार होणारा बनावट खवा, भेसळयुक्त मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांची विक्री तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली. तसेच संबंधित स्वीटमार्ट्सवर धाडी टाकून नमुने तपासावेत, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सहआयुक्त श्री. पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रकरणी तातडीने तपास करून आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची तक्रार अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनाही ई-मेलद्वारे करण्यात आली असून, राज्यभर सुरू असलेल्या अन्न भेसळविरोधी मोहिमेअंतर्गत या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. “नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. भेसळयुक्त मिठाई आणि बनावट खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कठोर कारवाई झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. आता या गंभीर प्रकरणात प्रशासन प्रत्यक्षात कोणती कारवाई करते, याकडे चिखलीसह जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Exit mobile version