-पंजाबातील शेतकऱ्यांची आंदोलनात उडी; सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ संघर्ष तीव्र, केंद्र सरकारवर वाढला दबाव
नवी दिल्ली | प्रतिनिधी : सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाने आता नवे राजकीय वळण घेतले असून, आंदोलनकर्त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी पुढे रेटली आहे. राजधानी दिल्लीतील आंदोलनस्थळी देशाच्या विविध भागांतून नागरिक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि पंजाबमधील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने आंदोलनाची तीव्रता आणखी वाढली आहे.
आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून शांततापूर्ण आंदोलन करूनही केंद्र सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता आंदोलन अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंजाबमधील शेतकरी संघटनांनीही आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत दिल्लीत दाखल होत संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, हे आंदोलन केवळ एका व्यक्तीचे नसून लोकशाही, पर्यावरण, संविधानिक हक्क आणि जनतेच्या आवाजासाठी उभा राहिलेला संघर्ष आहे. आंदोलनकर्त्यांनी “जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्या”, “लोकशाही वाचवा” आणि “मोदी राजीनामा द्या” अशा घोषणा देत केंद्र सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. आंदोलनस्थळी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आला असून, परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. आंदोलकांनी मात्र आपला संघर्ष शांततापूर्ण मार्गानेच सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, विविध शेतकरी संघटना, सामाजिक संस्था आणि युवक संघटनांकडून या आंदोलनाला पाठिंबा वाढत असल्याचे दिसून येत आहे. आंदोलनाची पुढील दिशा काय असेल आणि केंद्र सरकार यावर काय भूमिका घेणार, याकडे देशभराचे लक्ष लागले आहे.

