भूमिपुत्र केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनता दरबारात तक्रारींचा ऑन-द-स्पॉट निपटारा!

admin Add a Comment 4 Min Read
4 Min Read

-३०० हून अधिक तक्रारींवर विभागनिहाय सुनावणी; अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाईचे आदेश, गैरहजर अधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्र्यांचा थेट इशारा

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : भूमिपुत्र तथा केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकारातून आयोजित भव्य जनता दरबाराला शनिवारी (दि. १८ जुलै) सकाळी ११ वाजता सिंदखेडराजा येथील मातोश्री मंगल कार्यालयात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने आयोजित या जनता दरबारात विविध विभागांशी संबंधित सुमारे ३०० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या. अनेक प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्यात आला, तर उर्वरित तक्रारी निश्चित कालमर्यादेत निकाली काढण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सेवाभावी वृत्तीने काम करणे आवश्यक आहे. प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन वेळेत कार्यवाही करावी. कोणत्याही नागरिकाला न्यायापासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांमध्ये नागरिकांच्या तक्रारींचा थेट निपटारा करण्यासाठी आयोजित ‘जनता दरबार’ उपक्रमाचा शुभारंभ राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमी सिंदखेडराजा येथून करण्यात आला. त्यामुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे, तहसीलदार अजित दिवटे, देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे, सायली जाधव, गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर, मुकेश मोहर, बळीराम मापारी, माजी आमदार शशिकांत खेडेकर, मायाताई म्हस्के, सिंदखेडराजा नगराध्यक्ष सौरभ तायडे, देऊळगाव राजा नगराध्यक्षा माधुरी शिपणे, योगेश जाधव, डॉ. सुनील कायदे, सतीश कायदे, भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षक रचना जाधव, पोलीस निरीक्षक आशिष इंगळे, संजय मातोंडकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी प्रास्ताविकातून जनता दरबाराची रूपरेषा, उद्दिष्टे आणि प्राप्त तक्रारींची माहिती दिली. त्यानंतर प्रत्येक अर्जावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत विभागनिहाय सुनावणी घेण्यात आली. अनेक तक्रारींवर जागेवरच निर्णय घेण्यात आले, तर उर्वरित प्रकरणे निश्चित मुदतीत निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विशेष भूमिका मांडताना प्रतापराव जाधव म्हणाले की, शेतरस्त्यांअभावी शेतीची कामे किंवा पेरणी खोळंबता कामा नये. महसूल, भूमी अभिलेख, कृषी आणि संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात. प्रत्येक तक्रारदाराला योग्य मार्गदर्शन आणि न्याय मिळेल, याची प्रशासनाने जबाबदारी घ्यावी. जनता दरबारात शेतरस्ते, घरकुल, पाणीपुरवठा, महसूल, पोलीस, महिला व बालविकास, महावितरण, मनरेगा, कृषी, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, परिवहन, भूमी अभिलेख, आरोग्य विभाग तसेच बँका आणि पतसंस्थांशी संबंधित सुमारे ३०० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या. प्रत्येक तक्रारीवर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून आवश्यक निर्देश देण्यात आले. दाखल झालेल्या तक्रारींचा केवळ कागदोपत्री निपटारा न होता प्रत्यक्ष कार्यवाही झाली आहे की नाही, याचा सातत्याने पाठपुरावा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत केला जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा

जनता दरबारास अनुपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यांबाबत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जनतेच्या प्रश्नांसाठी आयोजित महत्त्वाच्या उपक्रमाकडे दुर्लक्ष करणे ही गंभीर बाब असून, अशा अधिकाऱ्यांविरुद्ध संबंधित विभागांच्या वरिष्ठांनी तातडीने प्रशासकीय कारवाई करावी, असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा थेट इशाराही त्यांनी दिला. नागरिक आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद घडवून आणणारा हा जनता दरबार अनेकांसाठी दिलासादायक ठरला. तक्रारींचा ऑन-द-स्पॉट निपटारा आणि तातडीच्या कार्यवाहीच्या आदेशांमुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले.

Share This Article
Exit mobile version