जंतरमंतरवर पोलिसांची धडक; सोनम वांगचुक यांना बळजबरीने हटविल्याचा सीजेपी संस्थापक अभिजीत दिपके यांचा आरोप!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-२१ दिवसांच्या उपोषणाला पोलिसी हस्तक्षेप; आंदोलनकर्त्यांचा संताप, सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी

नवी दिल्ली | प्रतिनिधी : राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला शनिवारी नाट्यमय वळण लागले. सलग २१ दिवसांपासून आमरण उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल केले. मात्र, “सोनम वांगचुक यांना पोलिसांनी बळजबरीने उचलून नेले,” असा गंभीर आरोप सीजेपी (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला आहे. या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

जंतरमंतरवर गेल्या अनेक दिवसांपासून विविध सामाजिक मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोनम वांगचुक यांनी २८ जूनपासून आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या २१व्या दिवशी त्यांची प्रकृती खालावत असल्याचे सांगत दिल्ली पोलिसांनी त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलविले. दरम्यान, सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी या कारवाईवर तीव्र आक्षेप घेत “लोकशाहीत शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार हिरावून घेतला जात आहे. आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांचा वापर करण्यात आला,” असा आरोप केला. आंदोलन मागे हटणार नसून न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. घटनेनंतर जंतरमंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनीही या कारवाईवर नाराजी व्यक्त केली असून, सोशल मीडियावरही या घटनेची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. सोनम वांगचुक यांची प्रकृती चिंताजनक होत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, विविध सामाजिक संघटनांनी या प्रकरणावर सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. आंदोलनकर्त्यांनीही पुढील रणनीती जाहीर करण्याचे संकेत दिल्याने जंतरमंतरवरील संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Share This Article
Exit mobile version