-छत्रपती संभाजीनगर व पुणे विभागातील सुमारे ३०० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग; आपत्तीपूर्व तयारी ते पुनर्वसनापर्यंत सखोल मार्गदर्शन
आळंदी (अर्जुन मेदनकर) : नगरपरिषद प्रशासन संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या आदेशान्वये आळंदी नगर परिषदेच्या वतीने फ्रूटवाले धर्मशाळा, आळंदी येथे छत्रपती संभाजीनगर व पुणे विभागातील नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रशिक्षणात दोन्ही विभागांतील विविध नगरपरिषदांमधील सुमारे ३०० अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.
प्रशिक्षणादरम्यान राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वे, आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका, नागरिकांचा सहभाग, आपत्ती जोखीम कमी करणे (Disaster Risk Reduction), हवामान बदलामुळे वाढणारी शहरी आपत्तीची तीव्रता तसेच आपत्ती प्रतिरोधक (Resilient) शहरे उभारण्याच्या संकल्पनेवरही सखोल चर्चा करण्यात आली. मान्यवरांनी आपल्या मनोगतात आपत्ती व्यवस्थापन ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून लोकसहभागातून प्रभावीपणे राबविण्याची सामूहिक प्रक्रिया असल्याचे सांगितले. प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत, बचावकार्य आणि समन्वय साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन आणि व्यवस्थापन आळंदी नगर परिषदेने उत्कृष्टरीत्या केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी तसेच आयोजन समितीने मोलाचे योगदान दिले. उपस्थित सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि प्रत्यक्ष कामकाजासाठी मार्गदर्शक ठरल्याची भावना व्यक्त केली.

