-मुख्य आरोपी किसन शिराळे व शिवाजी शिराळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
चिखली (महेंद्र हिवाळे) : शेलगाव जहागीर येथे ३० जून २०२६ रोजी घडलेल्या अनुसूचित जाती अत्याचार प्रकरणात महत्त्वाची घडामोड झाली आहे. सौ. उषा रमेश साळवे व त्यांच्या मुलीला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी किसन सुखदेव शिराळे आणि शिवाजी किसन शिराळे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जास बुलढाणा येथील माननीय जिल्हा व सत्र न्यायालयाने १६ जुलै २०२६ रोजी नकार दिला.
फिर्यादीच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. राजेश जाधव आणि ॲड. अंबादास जाधव यांनी विविध न्यायनिवाड्यांचा आधार घेत प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. अरुण गवई, ॲड. विद्याधर गवई आणि ॲड. शंकर चव्हाण यांनी सहकार्य केले. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता ॲड. भटकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रकरणाच्या तपास प्रक्रियेला बळ मिळाल्याची भावना फिर्यादी पक्षाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकरणाकडे समाजातील विविध घटकांचे लक्ष लागले असून, सामाजिक कार्यकर्ते मनीष मोरे, ॲड. राजीव जाधव, ॲड. सतीश गवई, प्रा. राजेंद्र गवई, विनोद साळवे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, तालुकाध्यक्ष संजय धुरंधर, प्रविण खरात, सुमेध जाधव, संजय जाधव, प्रकाश बनकर, विलास घोरपडे, दीपक साळवे, पत्रकार हिम्मतराव जाधव, प्रशांत डोंगरदिवे, छोटू कांबळे, विकी शिनगारे, प्रा. मिलिंद मघाडे, पँथर संकेत जाधव यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेलगाव जहागीर येथील ग्रामस्थ आणि चिखली परिसरातील नागरिक या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर संबंधित आरोपींना लवकर अटक करून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिक आणि समाजबांधवांकडून व्यक्त केली जात आहे. “न्याय हा केवळ मिळालाच पाहिजे असे नाही, तर तो होताना दिसलाही पाहिजे,” अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

