साखरखेर्ड्यातील गट क्र. ८७० मधील १.६२ हेक्टर जमीन क्रीडांगणासाठी राखीव; ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-ग्रामसभेनंतर खेळाडूंचा जल्लोष; फटाके फोडून व्यक्त केला आनंद

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा येथील गट क्रमांक ८७० मधील १ हेक्टर ६२ आर शासन मालकीची जमीन क्रीडांगणासाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण ठराव ग्रामसभेत एकमुखाने मंजूर करण्यात आला. या निर्णयाचे गावातील युवक, खेळाडू आणि नागरिकांनी जोरदार स्वागत करत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

सदर जागेवर पूर्वीपासून क्रीडांगण असून ती युवकांना खेळण्यासाठी कायमस्वरूपी राखीव ठेवण्याची मागणी ग्रामसभेत मांडण्यात आली. या मागणीला उपस्थित नागरिक आणि युवकांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत एकमताने ठराव मंजूर केला. दहा दिवसांपूर्वी या भूखंडावर अतिक्रमणाच्या उद्देशाने नांगरणी करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. याला शेकडो युवकांनी तीव्र विरोध दर्शविल्याने गावातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. त्यावेळी तहसीलदार अजित दिवटे आणि ठाणेदार युवराज रबडे यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. त्यांनी ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचे तसेच जमीन सपाटीकरण करण्याचे निर्देश दिले होते. ही जमीन पूर्वी साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटीच्या ताब्यात होती. संबंधित जमीन शासनाच्या नावे वर्ग करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश सदस्य उल्हास देशपांडे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. त्यानंतर ही जमीन शासनाच्या नावे करण्यात आली. मात्र, काही व्यक्तींनी संबंधित भूखंड त्यांच्या मालकीचा असल्याचा दावा करत त्यावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता.

ग्रामसभेत गोपाल राजपूत यांनी संबंधित जमीन साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटीच्या नावे असून प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगितले. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर ती जमीन क्रीडांगणासाठी राखीव ठेवावी, मात्र मालकी संस्थेच्या नावावर असावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, उपस्थित नागरिकांनी या मताला विरोध करत जमीन शासनाच्या नावे कायम ठेवून ती क्रीडांगणासाठीच राखीव ठेवण्याची मागणी केली.

या ग्रामसभेला प्रशासकीय सरपंच सौ. ज्योती अमित जाधव, माजी सरपंच पूनम महेंद्र पाटील, सुमनताई जगताप, कमलाकर गवई, दाऊद कुरेशी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, भाजपचे प्रदेश सदस्य उल्हास देशपांडे, सय्यद रफीक, शेख युनुस, इब्राहिम शहा, चंद्रशेखर शुक्ल, सुनील जगताप, माजी सभापती राजू ठोके, रामदाससिंग राजपूत, ललित अग्रवाल, दिलीप इंगळे, शुभम राजपूत, ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे, दिलीप खंडारे, संग्रामसिंह राजपूत यांच्यासह शेकडो क्रीडाप्रेमी युवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज मोरे यांनी केले, तर सूत्रसंचालन अरुण देशमुख यांनी केले. ग्रामसभा संपल्यानंतर युवक व खेळाडूंनी साखरखेर्डा बसस्थानक परिसरात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. “जमीन नाही कुणाच्या बापाची, ती आहे सरकारची” आणि “क्रीडांगण झालेच पाहिजे” अशा घोषणा देत त्यांनी निर्णयाचे स्वागत केले. या वेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

Share This Article
Exit mobile version