चिखला-काकड अनधिकृत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणातील मुख्य आरोपी न्यायालयीन कोठडीत

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-मुख्य आरोपी बाळू आवारेची न्यायालयीन कोठडीत रवानगी; प्रकरणातील इतर संबंधितांचा शोध सुरू

दुसरबीड (भगवान नागरे) : लोणार तालुक्यातील चिखला-काकड येथील बहुचर्चित अनधिकृत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणातील मुख्य आरोपी बाळराजे रामराव आवारे उर्फ बाळू आवारे (वय ३७, रा. महाकाल, ता. अंबड, जि. जालना) याला बीबी पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, २१ फेब्रुवारी रोजी चिखला-काकड येथे अनधिकृतरित्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्याप्रकरणी बीबी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १३३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२९(३), ३५३(३) तसेच महाराष्ट्र पुतळ्याचे पावित्र्य भंग प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पुतळा उभारण्यात बाळू आवारे याचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर बीबी पोलिसांनी १४ जुलै रोजी पहाटे सोलापूर येथून त्याला अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर १५ जुलै रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

या घटनेनंतर चिखला-काकड गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. दोन समाजांमध्ये रोष निर्माण झाल्याने राज्यभरातून विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते गावात दाखल झाले होते. या काळात गावात निदर्शने, मोर्चे, सभा तसेच काही ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटनाही घडल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच गावात संचारबंदी लागू करण्यात आली होती. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक नेत्यांच्या प्रयत्नांनंतर परिस्थिती हळूहळू पूर्ववत झाली. दरम्यान, या प्रकरणात पुतळा कुठून आणण्यात आला, तो कोणी मागविला, उभारण्यामागे नेमकी कोणाची भूमिका होती आणि या संपूर्ण घटनेमागील इतर संबंधित व्यक्ती कोण आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत. आरोपीकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीबी पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पाटील करीत आहेत.

Share This Article
Exit mobile version