-अहिल्यानगर लक्झरी बस असोसिएशन व ट्रॅव्हल्स असोसिएशनचा सेवाभावी उपक्रम; ‘वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा’ भावनेतून आयोजन
अहिल्यानगर (बाळासाहेब खेडकर) : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या आषाढी वारीनिमित्त अहिल्यानगर लक्झरी बस असोसिएशन व ट्रॅव्हल्स असोसिएशन यांच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी वारकरी बांधवांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी व फराळाचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमातून पाच हजारांहून अधिक वारकऱ्यांना सेवा देण्यात आली.
उपक्रमाच्या प्रारंभी श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून विठ्ठल नामाचा गजर करण्यात आला. त्यानंतर दिंड्यांमधून येणाऱ्या वारकरी बांधवांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे, वेफर्स, फराळी चिवडा आणि चिक्कीचे वाटप करण्यात आले. उन्हाचा तडाखा आणि दीर्घ पायी प्रवासामुळे थकलेल्या वारकऱ्यांसाठी हा अल्पोपहार मोठा दिलासा ठरला. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे असोसिएशनमधील सर्व गाडी मालक, चालक, पदाधिकारी आणि सदस्यांनी स्वतः उपस्थित राहून सेवा कार्यात सहभाग घेतला. कोणताही दिखाऊपणा न करता वारकऱ्यांना प्रेमाने पाणी व फराळ देत त्यांच्या सेवेत योगदान दिले. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आयोजकांच्या सेवाभावातून या उपक्रमाचे यश अधोरेखित झाले.
संस्थापक अध्यक्ष शिवाजी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि वारकरी संप्रदायाविषयीचा आदर याचे दर्शन या उपक्रमातून घडले. “वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठलाची सेवा” या भावनेने सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी एकदिलाने काम केले. यावेळी अध्यक्ष शिवाजी उबाळे, उपाध्यक्ष (उपनगर) अमोल भांड, उपाध्यक्ष प्रमोद बेदमुथ्या, सेक्रेटरी रियाज मुलानी, खजिनदार गणेश गायकवाड, सचिव ईश्वर धोका, सहसचिव धर्मा वाघस्कर, प्रवक्ते सरवर कुरेशी, संघटक गणेश उपाध्ये, आपला मावळा महिला प्रदेशाध्यक्षा प्रियंका पाटील शेळके यांच्यासह असोसिएशनचे सर्व गाडी मालक, चालक आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. वारकरी बांधवांनीही आयोजकांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक करत अशा उपक्रमांचे भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या सेवाकार्यातून सामाजिक उत्तरदायित्व, माणुसकी आणि विठ्ठलभक्तीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.