साटोडा परिसरात दूषित, गढूळ पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-जीवन प्राधिकरणाच्या हलगर्जीपणाचा आरोप; अतिसार, ताप व उलट्यांच्या वाढत्या रुग्णांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वर्धा (प्रकाश कथले) : शहरालगतच्या साटोडा परिसरात मागील काही दिवसांपासून दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या योजनेवर अवलंबून असलेल्या शेकडो कुटुंबांना अस्वच्छ पाणी वापरण्याची वेळ आली असून, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर रहिवाशांना अतिसार, ताप, उलट्या आदी आजारांनी ग्रासल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जीवन प्राधिकरणाकडून पुरविण्यात येणारे पाणी इतके गढूळ आहे की, ते पातेल्यात किंवा पारदर्शक बाटलीत भरल्यानंतर त्यातील मळ स्पष्टपणे दिसून येतो. दूषित पाण्यामुळे अनेक कुटुंबांतील सदस्य आजारी पडले असून, काही घरांमध्ये एकाच वेळी दोन ते तीन जणांना अतिसार, उलट्या व तापाचा त्रास होत आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फटका बसत असल्याने वैद्यकीय उपचारांसाठी धावपळ सुरू आहे. यासंदर्भात जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात येत नसल्याने परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दूषित पाणीपुरवठ्यामागील नेमकी कारणे शोधून पाणीपुरवठा यंत्रणेची तातडीने तपासणी करावी, आवश्यक दुरुस्ती करून शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

स्थानिक नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया

जीवन प्राधिकरण नियमितपणे पाणीपुरवठ्याचे देयक आकारते; मात्र त्याबदल्यात दूषित आणि असुरक्षित पाणी पुरवले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. या प्रकाराला जबाबदार असलेल्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

Share This Article
Exit mobile version