-संघर्षातून यशस्वी झालेल्या मान्यवरांच्या प्रेरणादायी प्रवासाचा उलगडा; युवकांनी ध्येय निश्चित करून जिद्दीने वाटचाल करण्याचे आवाहन
चिखली (राजेंद्र घुबे) : लेखक विनोद बोरे यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘चला घेऊया, ध्येयवेड्या व्यक्तिमत्त्वांची प्रेरणा…’ हा प्रेरणादायी कार्यक्रम चिखली येथील श्रीराम नागरी पतसंस्थेच्या राष्ट्रमाता जिजाऊ सभागृहात उत्साहात पार पडला. संघर्षातून यश मिळविलेल्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या जीवनप्रवासाची प्रेरणादायी मांडणी यावेळी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिखलीचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख होते, तर नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांनी उद्घाटन केले. प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस नेते श्याम उमाळकर, मेहकरचे नगराध्यक्ष किशोर गारोळे, पैनगंगा सीड्स कंपनीचे संचालक डॉ. सचिन मापारी, राठी हॉस्पिटलचे संचालक डॉ. धनराज राठी, एमएसईबी कंत्राटदार सुखदेव लहाने, सप्तशृंगी महिला अर्बनच्या अध्यक्षा ॲड. माधुरी पवार तसेच दुग्ध व्यावसायिक राजेंद्र निकम उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी स्पष्ट ध्येय, सातत्यपूर्ण परिश्रम आणि जिद्द आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. “एक ध्येय पूर्ण झाल्यानंतर पुढील ध्येय निश्चित करून त्यासाठी झपाटून काम केले, तर यश निश्चित मिळते,” असा संदेश त्यांनी युवकांना दिला.
कार्यक्रमात राजकीय व व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी झालेले रामदास देव्हडे, शिक्षण संस्थाचालक तथा उद्योजक मनोज दांडगे, कैलाश इंडस्ट्रीजचे संचालक संजय जैन, राजघराणा कलेक्शनचे संचालक प्रवीण पडघान, आपल्या पाचही मुलांना उच्च पदांवर पोहोचविणाऱ्या पद्मिनी नरवाडे, कंत्राटदार तथा चावडी हॉटेलचे मालक विलास देशमुख, स्वराज्य अकॅडमीचे संचालक अनिल ढगे, सहाय्यक गटविकास अधिकारी सागर पवार, लेखक शिवाजी म्हस्के, सनदी लेखापाल (सीए) गार्गी ठाकरे, मुलांना घडविणाऱ्या शंकुतला साळोक तसेच चव्हाण मल्टी सर्व्हिसेसचे संचालक विनोद चव्हाण यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाचे प्रभावी सादरीकरण लेखक विनोद बोरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद बोरे यांनी केले. सूत्रसंचालन सहाय्यक महसूल अधिकारी विद्या वायाळ यांनी केले, तर आभार साहित्यिक किसन पिसे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, युवक, शेतकरी, महिला तसेच विविध क्षेत्रांतील नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.