जिजाऊंच्या लेकींसाठी हक्काचे व्यासपीठ साकारण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-सीईओ गुलाबराव खरात यांच्या पुढाकाराने महिला बचत गट उत्पादक केंद्राच्या रखडलेल्या इमारतीच्या उर्वरित बांधकामास सुरुवात

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी तसेच महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सिंदखेडराजा पंचायत समिती परिसरातील महिला बचत गट उत्पादक बहुउद्देशीय केंद्राच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या इमारतीच्या उर्वरित बांधकामास अखेर सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गुलाबराव खरात यांच्या पुढाकारामुळे या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला गती मिळाली आहे.

महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळवून देणे तसेच ग्रामीण महिलांना रोजगार व उद्योजकतेच्या संधी निर्माण करून देणे, या उद्देशाने या केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील महिला बचत गटांसाठी हे केंद्र भविष्यात अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मानले जात आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या इमारतीच्या कामाला सुरुवात झाल्याने महिला बचत गटांच्या सदस्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेला यामुळे अधिक बळ मिळणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, कार्यकारी अभियंता सुशील गुडधे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी प्रकाश राठोड तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा नंदाताई कायंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना सीईओ गुलाबराव खरात यांनी सांगितले की, महिला बचत गटांसाठी स्वतंत्र केंद्र उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या उत्पादनांना स्थानिक पातळीवर बाजारपेठ मिळेल. यामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ प्राप्त होईल. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी महिलांचा विकास हा ग्रामीण विकासाचा महत्त्वाचा आधार असल्याचे सांगितले. महिला व बालकांच्या विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर यांनी मातृतीर्थ सिंदखेडराजातील जिजाऊंच्या लेकींसाठी हे केंद्र पूर्णत्वास नेण्यासाठी सीईओ गुलाबराव खरात यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आभार व्यक्त केले. तसेच जिल्हा परिषद परिसरात माँ जिजाऊ आणि बाल शिवराय यांच्या पुतळ्याची उभारणी केल्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा नंदाताई कायंदे यांनी महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीमध्ये सक्रिय योगदान देत स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन केले. बचत गटांचे जिल्हा समन्वयक विक्रांत जाधव यांनी जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या कार्याचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक विनोद ठाकरे यांनी केले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी सौदागर पवार, गटशिक्षणाधिकारी स्वप्निल निकम, महिला व बालकल्याण अधिकारी जीवन राठोड, अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, बचत गटांच्या महिला, अंगणवाडी सेविका तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version