पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेवगाव–पाथर्डी टंचाई आढावा बैठक संपन्न

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-ताजनापूर योजनेसाठी २५० कोटींचा निधी; बंधारे, तलाव दुरुस्तीसाठी साडेसहा कोटींची तरतूद, पाणीपुरवठा व सिंचनासाठी महत्त्वाचे निर्णय

शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : शेवगाव–पाथर्डी तालुक्यातील पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना, ताजनापूर टप्पा क्रमांक १ योजनेसाठी २५० कोटी रुपयांचा निधी तसेच बंधारे व तलावांच्या दुरुस्तीसाठी सुमारे साडेसहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. अमरापूर येथील श्री लॉन्स येथे आयोजित शेवगाव–पाथर्डी टंचाई आढावा व समन्वय बैठकीत ते बोलत होते.

बैठकीत शेवगाव शहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या व प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर दोन्ही तालुक्यांमध्ये टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या. नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांनी शेवगाव–पाथर्डी हा कायमस्वरूपी दुष्काळी भाग असल्याने राज्यातील नदीजोड प्रकल्पामध्ये या भागासाठी स्वतंत्र पाणी आरक्षित ठेवण्याची मागणी केली. तसेच मागील वर्षीच्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या साठवण बंधारे व तलावांच्या दुरुस्तीसाठी साडेसहा कोटी रुपयांचा निधी, ताजनापूर उपसा सिंचन योजना क्रमांक १ व २ साठी आवश्यक निधी, मुळा पाटबंधारे योजनेचे पाणी शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कालव्यांची दुरुस्ती तसेच पावसाळा लांबल्यास आवश्यक गावांमध्ये तातडीने टँकर सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, ‘अल निनो’च्या प्रभावामुळे पावसाळा लांबल्याने टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहून नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात. ते पुढे म्हणाले की, महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत. आमदार मोनिकाताई राजळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शेवगाव तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ताजनापूर टप्पा क्रमांक १ योजनेसाठी २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येत आहे. तसेच शेवगाव–पाथर्डी मतदारसंघातील बंधारे व तलावांच्या दुरुस्तीसाठी सुमारे साडेसहा कोटी रुपयांची तरतूदही लवकरच करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेवगाव–पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

बैठकीस उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार आकाश दहाडदे, तहसीलदार उद्धव नाईक, गटविकास अधिकारी सोनल शहा, राजेंद्र धस, मुख्याधिकारी विजया गाडगे (शेवगाव), मुख्याधिकारी संतोष लांडगे (पाथर्डी), मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, जिल्हा परिषद सदस्य राहुलदादा राजळे, बापूसाहेब भोसले, जिल्हा समन्वयक विनायक देशमुख, गणेश भालसिंग, विधानसभा समन्वयक नारायण पालवे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन वायकर, नगराध्यक्ष अभय आव्हाड, भाजप मंडलाध्यक्ष महेश फलके, अमोल सागडे, धनंजय बडे, संजय टाकळकर, माजी नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, अजय रक्ताटे, भीमराज सागडे, युवराज नरवडे, उपनगराध्यक्ष मंगलताई कोकाटे, आशाताई गरड तसेच शेवगाव–पाथर्डी तालुक्यातील भाजप पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते आणि विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधानसभा समन्वयक नारायण पालवे यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश बाबर व राजेंद्र सुरवसे यांनी केले, तर आभार मार्केट कमिटीचे सभापती सुभाष बर्डे यांनी मानले.

Share This Article
Exit mobile version