मंगरूळ नवघरे (महेंद्र हिवाळे) : मंगरूळ नवघरे येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील शिक्षकांबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले आमरण उपोषण आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या पुढाकारामुळे अखेर मागे घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी प्रशासनाशी तातडीने संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन स्थगित केले.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची माहिती मिळताच आमदार श्वेता महाले यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्ते, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक आणि ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित कोणतीही समस्या दुर्लक्षित केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली. यानंतर त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून संबंधित पाच शिक्षकांचा प्रस्ताव तातडीने तयार करून विभागीय आयुक्तांकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या. तसेच शाळेच्या गरजेनुसार नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी प्रस्ताव त्वरित तयार करण्याबाबत शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनाही निर्देश दिले.
यावेळी आमदार श्वेता महाले म्हणाल्या की, मंगरूळ नवघरे येथील ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांना पुन्हा जिल्हा परिषद शाळेकडे वळविण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असून त्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड होऊ दिली जाणार नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असेल, तर प्रशासनाने वस्तुनिष्ठ चौकशी करून आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही तातडीने करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. आमदार श्वेता महाले पाटील यांच्या वतीने त्यांचे वडील अंकुशराव पाटील यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी देऊन उपोषण सोडविण्यात आले. यावेळी भास्करराव मोरे, कुणाल गायकवाड, एकनाथराव जाधव, संतोष वाकडे, श्री. जैन, प्रवीण वायाळ यांच्यासह ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.