-गोपाल मानतकर यांच्या पुढाकारातून १९ जुलै रोजी भव्य रोगनिदान व औषधोपचार शिबिराचे आयोजन
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : आरोग्य विभागात औषध निर्माण अधिकारी म्हणून तब्बल ४० वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या गोपाल मानतकर यांनी सेवापूर्ती सोहळा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेत जनसेवेलाच प्राधान्य दिले आहे. त्यांच्या पुढाकारातून रविवार, दि. १९ जुलै रोजी श्री पलसिद्ध महास्वामी मठ, साखरखेर्डा येथे भव्य मोफत रोगनिदान व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोपाल मामा मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माण अधिकारी म्हणून कार्यरत असताना गोपाल मानतकर यांनी रुग्णसेवेत कधीही कसूर केली नाही. दररोज ३०० ते ३५० रुग्णांची ओपीडी असतानाही प्रत्येक रुग्णाशी माणुसकीने वागून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, हा त्यांचा सेवाधर्म राहिला. स्वर्गीय डॉ. सुखदेव मानतकर यांचा सेवेचा वारसा त्यांनी समर्थपणे पुढे चालविला. दि. १ जुलै रोजी ते सेवानिवृत्त झाले असून, पारंपरिक सत्कार सोहळ्याऐवजी समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
भूमिपुत्र वैद्यकीय मदतकक्ष, बुलढाणा आणि केंद्रीय आयुष मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात मेडिसीन व छातीविकार, अस्थिरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा, बालरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, हृदयविकार, मेंदूविकार, किडनी, दंतरोग, यकृत व पोटविकार, शस्त्रक्रिया तसेच कर्करोग तज्ज्ञांकडून रुग्णांची तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत. या शिबिराचे उद्घाटन माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून कामगार कल्याण मंत्री आकाश फुंडकर, माजी मंत्री तथा आमदार डॉ. संजय कुटे, आमदार श्वेता महाले, आमदार मनोज कायंदे, आमदार संजय गायकवाड, आमदार सिद्धार्थ खरात, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर तसेच अनिल नावंदर उपस्थित राहणार आहेत.

