चिखलीच्या सुपुत्राने उंचावली बुलढाणा जिल्ह्याची मान!

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-मुंबई वाहतूक विभागातील पोलीस शिपाई चंद्रनिलकांत सोनुने यांच्या माणुसकीपूर्ण कार्याचा प्रशंसापत्र देऊन गौरव

चिखली (महिंद्र हिवाळे) : मुंबईतील बाबुलनाथ मंदिर, गावदेवी परिसरात सुमारे ८० वर्षीय एक वृद्ध महिला दीड तासापासून टॅक्सीच्या प्रतीक्षेत उभ्या होत्या. त्यांना महालक्ष्मी येथे जायचे असतानाही कोणताही टॅक्सीचालक त्यांना घेऊन जाण्यास तयार नव्हता. अशा वेळी ताडदेव वाहतूक विभागात कर्तव्यावर असलेले बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचे सुपुत्र तथा मुंबई पोलीस दलातील वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई चंद्रनिलकांत किशोर सोनुने (बॅज क्र. ०९०८६१) यांनी तत्परता दाखवत त्या वृद्ध महिलेला सुरक्षितपणे पुढील प्रवासासाठी मदत केली.

या माणुसकीपूर्ण कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, शेतकरी संघटना (क्रांतिकारी)चे नेते रविकांत तुपकर यांनीही त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम आणि फेसबुक पेजवर हा व्हिडिओ शेअर करून मुंबई पोलिसांच्या संवेदनशील कार्याचे कौतुक केले आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत बृहन्मुंबईचे पोलीस सहआयुक्त (वाहतूक) सत्यनारायण चौधरी यांच्या हस्ते पोलीस शिपाई चंद्रनिलकांत सोनुने यांना प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले. कर्तव्य बजावत असतानाच माणुसकी जपणाऱ्या त्यांच्या या कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांनी चिखलीसह बुलढाणा जिल्ह्याचे नाव अभिमानाने उंचावले आहे. “खाकी वर्दीचा खरा अर्थ केवळ कायद्याची अंमलबजावणी नव्हे, तर गरजूंच्या मदतीला धावून जाणे आणि माणुसकी जपणे हा आहे,” याची प्रचिती चंद्रनिलकांत सोनुने यांच्या या कृतीतून पुन्हा एकदा आली.

Share This Article
Exit mobile version