-शिवसेना-युवासेनेचे गटविकास अधिकाऱ्यांना घेराव; युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
चिखली (अंकुश पाटील) : सिंचन विहिरींसाठी मंजूर निधीचे वितरण, घरकुल योजनांची रखडलेली कामे तसेच ग्रामपंचायत स्तरावरील विविध विकासकामांमध्ये पारदर्शकता राखली जात नसल्याचा आरोप करत शिवसेना-युवासेनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घालून आंदोलन करण्यात आले. युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ पंचायत समिती परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
यावेळी शहरप्रमुख श्रीरामभाऊ झोरे, शहर संघटक प्रीतमभाई गैची, युवासेना शहरप्रमुख आनंद गैची यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलकांनी शासनाच्या विविध योजनांतील लाभार्थ्यांची कामे महिनोनमहिने प्रलंबित ठेवली जात असल्याचा निषेध व्यक्त केला. सिंचन विहिरींसाठी मंजूर झालेला निधी वेळेत वितरित होत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून अनेकांवर कर्जाचा बोजा वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच घरकुल लाभार्थ्यांना मंजूर निधी वेळेवर न मिळाल्याने अनेकांची घरे अर्धवट अवस्थेत असून पावसाळ्यात त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. शासनाच्या योजनांमध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप न होता पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा, सर्व प्रकरणांची पारदर्शक पद्धतीने छाननी व्हावी, निधीचे वितरण वेळेत करावे आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे यांनी प्रशासनावर टीका करत सांगितले की, “शासनाच्या योजना सामान्य नागरिकांसाठी असताना त्यांची अंमलबजावणी अत्यंत संथ गतीने होत आहे. शेतकरी आणि गोरगरिबांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असतील, तर ही प्रशासनाची गंभीर अपयशाची बाब आहे. नागरिकांना न्याय मिळाला नाही, तर शिवसेना-युवासेना अधिक तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन उभारेल.” घेराव आंदोलनानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून निवेदनातील मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र, दिलेल्या आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शिवसेना-युवासेनेच्या वतीने देण्यात आला.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, शहरप्रमुख श्रीरामभाऊ झोरे, शहर संघटक प्रीतमभाई गैची, उपजिल्हाप्रमुख अशोक राजपूत, युवासेना शहरप्रमुख आनंद गैची, शिवसेना नेते लालसिंग मोरे, सखाराम पाटील, उपतालुकाप्रमुख राहुल मिसाळ, हरीभाऊ इंगळे, छगनराव वानखेडे, निवृत्ती घुबे, शुभम वानखेडे, मदनराजे आकाळ, उपशहरप्रमुख समाधान जाधव, रवीअप्पा पेठकर, पुंजाजी शेळके, अनिल जावरे, सोहेल शहा, किसान सेना तालुकाप्रमुख नारायण वाणी, अशोकराव मोहिते, दिनकर मोरे, गजानन डुकरे, लक्ष्मण इंगळे, राजू इंगळे, अंकुश इंगळे, संजय कदम, प्रदीप सपकाळ, गजानन फोलाने, दत्ता मेंद, कृष्णा फोलाने, गौतम गवई, संजय सोळंकी, सिद्धेश्वर सोळंकी, सोपान भालेकर, सुरज असोलकर, किशोर महाले, इम्रान शेख, अशोकराव भोसले, मालोजी गुजर, डॉ. प्रकाश काळे, सुपडाजी कोऱ्हाळे, गजानन काकडे, सचिन जोशी, सिद्धेश्वर ठेंग, वैभव ठेंग, प्रदीप गरुड, वसंतराव चौरे, रामदास जाधव, अंकुश डहाके, राजू लोखंडे, शिवाजी पंडित, गणेश वाघमारे, समाधान गायकवाड, कैलास गायकवाड, प्रल्हाद पवार, गजानन शेळके, समाधान पाटील, मंगेश मोळवंडे, तुषार वजगडे यांच्यासह शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

